संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अत्यंत जहरी आणि विध्वंसक आहेत अशा शब्दांमध्ये भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिने टीका केली आहे. कंगनाने गांधी यांच्यावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. एका शॉर्ट सेलरने सेबीच्या प्रमुख माधाबी पुरी-बुच यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्याच शॉर्ट सेलरला राहुल गांधी हे पाठिंबा देत असून त्यांचा राहुल गांधी या शॉर्ट सेलरचा उदो उदो करत असल्याचा गंभीर आरोप कंगना यांनी केला आहे. राहुल गांधी हा अत्यंत धोकादायक माणूस असून ते भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कंगना हिने केला आहे.
कंगना रणौत या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. त्यांनी X वर एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट लिहिली आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान होता येत नसल्याने त्यांनी देशाला उध्वस्त करण्याचे मनसुबे रचण्यास सुरुवात केल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांनी ज्या शॉर्टसेलरच्या अहवालाचे उदात्तीकरण केले आहे तो अहवाल भारताच्या स्टॉक मार्केटला लक्ष्य करणारा होता. हा अहवाल फुसका बार निघाला आहे असे कंगनाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी कायमस्वरुपी विरोधी पक्षात बसण्याची तयारी करावी कारण भारत राहुल गांधी यांना कधीही त्यांचा नेता म्हणून मान्यता देणार नाही, राहुल गांधी तुमचे कृत्य या देशाला मान खाली घालायला लावणारे आहे, असे कंगनाने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता ज्यात त्यांनी शॉर्ट सेलरने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून काही मागण्या केल्या होत्या. सेबीच्या प्रमुख माधाबी यांनी हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजीनामा का दिला नाही असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. या प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खेचण्याचा प्रयत्न केला असून पंतप्रधान याला जबाबदार कसे नाहीत असा सवाल विचारला आहे.
अहवालातील आरोपांना सेबी प्रमुखांचे खणखणीत उत्तर
शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आलेल्या आरोपांना सेबीच्या प्रमुख माधाबी पुरी-बुच यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, माधाबी आणि त्यांचे पती धवल यांचा अदाणी समूहाशी निगडीत ऑफशोअर कंपनीत हिस्सेदारी आहे. माधावी यांनी म्हटलंय की हे आरोप निराधार आणि चारित्र्यहननासाठी करण्यात आलेले आरोप आहेत. या दाम्पत्याने म्हटले आहे की ज्या फंडाचा उल्लेख आरोप करताना केला आहे त्या फंडामध्ये त्यांनी 2015 साली गुंतवणूक केली होती. त्यावेळी हे दाम्पत्य सिंगापूरचे नागरीक होते. हा व्यवहार माधाबी सेबीच्या प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्याच्या 2 वर्ष पूर्वी करण्यात आला होता असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवाल फक्त सनसनाटी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी
भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबद्दल बोलताना म्हटले की या शॉर्ट सेलर संस्थेची कोणतीही विश्वासार्हता नाहीये. या संस्थेने तयार केलेला अहवाल फक्त सनसनाटी निर्माण करणे आणि अस्थिरता निर्माण यापलिकडे काहीही नाही असे रोहतगी यांनी म्हटले आहे. असे करून बाजारातील परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि नफा कमवायचा इतकाच यामागचा उद्देश दिसत असल्याचे रोहतगी यांनी म्हटले आहे.