- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती भवनात खास डिनरचे आयोजन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील नेते या डिनरमध्ये सहभागी होणार
- विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना या डिनरचे निमंत्रण नाही
Putin dinner: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती भवनात पुतिन यांच्यासाठी खास डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना या डिनरसाठी निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्या ऐवजी काँग्रेसच्या दुसऱ्याच नेत्याला हे निमंत्रण देण्यात आलं आहे.
या खास डिनरसाठी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. थरूर यांच्या माहितीनुसार, त्यांना परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे अध्यक्ष या नात्याने हे निमंत्रण मिळाले आहे. यापूर्वी खर्गे यांना G20 च्या डिनरसाठीही बोलावले नव्हते, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या डिनरवरून राजकारण रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता पुतिन यांच्या सोबतच्या डिनरसाठी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनाच निमंत्रित करण्यात आलेले नाही.
दौऱ्यादरम्यान शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हैदराबाद हाऊसमध्ये सुमारे 3 तास विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या 'मेक इन इंडिया' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उल्लेख केला. भारत आणि रशिया मजबूत भागीदारीने पुढे जात असल्याचे सांगताना पुतिन म्हणाले की, रशियामध्ये भारत आणि रशिया मिळून एक मोठी औषध (फार्मास्युटिकल) फॅक्टरी उभारणार आहेत. रशियन कंपन्यादेखील 'मेक इन इंडिया'च्या फ्रेमवर्कमध्ये भारतात औद्योगिक प्रकल्प उभारत आहेत.
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांना 'व्यावसायिक तसेच वैयक्तिक' असल्याचे सांगितले. जे 'परस्पर विश्वासा'वर आधारित आहेत. रशिया आणि भारताची 70 वर्षांहून अधिक जुनी मैत्री 'ध्रुव ताऱ्याप्रमाणे' अटल आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे गुरुवारी सायंकाळी दिल्लीत आगमन झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे विमानतळावर अत्यंत उत्साहाने त्यांचे स्वागत केले. दोघेही एकाच कारमधून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना झाले होते