- मीरा-भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली फ्री वायफाय सेवा देणारी महापालिका ठरणार आहे
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नवीन फ्री वायफाय सेवेची घोषणा केली
- गेल्या तीन वर्षांत या शहरात १८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पूर्तता करण्यात आली आहे
Free WiFi : तुम्हाला जर कुणी फ्री वायफाय देत असेल तर? तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आता पर्यंत बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल, चित्रपटगृह, मॉल या सारख्या ठिकाणी फ्री वायफाय दिला जात होता. त्यातून तिथे जाणाऱ्यांना एक दिलासा मिळत होता. पण आता महाराष्ट्रातली एक महापालिका आपल्या नागरिकांना फ्री वायफाय देणार आहे. त्यामुळे या शहरातल्या नागरिकांचे मोबाईल रिचार्ज करण्याचे टेन्शन मिटणार आहे. फ्री वायफाय देणारी ही राज्यातली पहिला महापालिका ठरणार आहे. नागरिकांना दिलासा देणार हा निर्णय असल्याचं बोललं जात आहे.
मीरा-भाईंदर शहर लवकरच महाराष्ट्रातील पहिले 'फ्री वायफाय' देणारे (Free WiFi) शहर म्हणून ओळखले जाईल. मीरा-भाईंदर शहर डिजिटल करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत ही घोषणा केली. महानगरपालिका इमारतीत झालेल्या बैठकीत एम.बी.एम.सी. आयुक्त राधा विनोद शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा रोड-भाईंदर हे देशातील वेगाने वाढणारे शहर असल्याचं नमूद केलं. गेल्या 3 वर्षांत, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात 1,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यातील उदयोन्मुख शहरांमध्ये मोफत वायफाय सुविधा देण्याची मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सुरू झाली, असे ही सरनाईक म्हणाले.
मीरा-भाईंदरमधील नागरिकांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची मोफत उपलब्धता देणारे हे वायफाय तंत्रज्ञान 'प्रगतीची नवी लाट' घेऊन येईल असं ही ते म्हणाले. या संदर्भात, महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे. महाराष्ट्र हे स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. या करारामुळे राज्यातील दुर्गम भागांत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world