उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यानं रेल्वेमधील गर्दी वाढली आहे. त्यातच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचा ताण रेल्वेवर पडतोय. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये रेल्वेच्या AC कोचमध्ये येऊ दिलं नाही म्हणून संतापलेल्या प्रवाशानं दाराची काच फोडली आहे.
@gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन 19 एप्रिल रोजी 32 सेकंदांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. दिल्ली-आझमगड दरम्यान धावणाऱ्या कैफियत सुपरफास्ट एक्स्प्रेस (Kaifiyaat Superfast Express) मधील हा व्हिडिओ असल्याचा दावा या पोस्टमधील कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणातील कथित माहितीनुसार या प्रवाशानं एसी-3 टायर कोचमध्ये आरक्षण केलं होतं. पण, विनातिकीट प्रवाशांनी त्याला कोचमध्ये येऊ दिलं नाही. हा कोच दरवाजाच्या समोर फरशीवर दाटीवाटीनं बसलेल्या प्रवाशांनी गच्च भरला होता, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रवाशानं लोकांना दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यावर आतमध्ये बसलेल्या एका व्यक्तीनं 'जागा नाही' असं त्याला उत्तर दिलं. त्यामुळे त्यानं दाराची काच फोडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
प्रवाशांनी गच्च भरलेल्या रेल्वे कोचचे या पु्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी शेअर केले जातात. या आठवड्याच्या सुरुवातीलाही काशी एक्स्प्रेसमधील 2 टायर एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं व्हिडिओ शेअर केला होता. तो देखील चांगलाच व्हायरल झाला होता. त्या छोट्या क्लिपमध्ये कोचमधील गंभीर परिस्थिती दाखवण्यात आली होती. त्यामध्येही अनेक प्रवाशी फरशीवर बसले होते. कोचमधील एसी काम करत नाही. त्याचबरोबर जेवण किंवा पाणी दिलं जात नाहीय, असा दावा त्या व्यक्तीनं व्हिडिओमध्ये केला होता.
पश्चिम की सेंट्रल रेल्वे, कुठले एस्केलेटर सर्वात चांगले; उत्तर मिळालं!
रेल्वे प्रवासाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. त्यामध्ये एका महिलेच्या वागणुकीवर युझर्सनी संताप व्यक्त केला आहे. या महिलेनं जबरदस्तीनं बळकावलेलं सीट सोडण्यास नकार दिला होता. या व्हिडिओवर रेल्वे प्रशासनानंही प्रतिक्रिया दिली होती.