UTS App: रेल्वे प्रवाशांसाठी सोईस्कर असलेलं UTS अ‍ॅप बंद होणार; नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार

UTS ॲपवरील तुमचा शिल्लक आर-वॉलेट बॅलन्स पूर्णपणे सुरक्षित राहील. हे पैसे लॅप्स होणार नाहीत, तर ते तुमच्या 'RailOne' ॲपवर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

जाहिरात
Read Time: 2 mins

UTS App: रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा बदल जाहीर केला आहे. येत्या 1 मार्च 2026 पासून जुन्या 'UTS-on Mobile' (UTS) ॲपची सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी प्रवाशांना आता 'RailOne' या अधिकृत ॲपचा वापर करावा लागणार आहे. 

UTS ॲप सेवा टप्प्याटप्प्याने बंद

पहिल्या टप्प्यात दक्षिण रेल्वेच्या माहितीनुसार, UTS ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीझन तिकीट (पास) बुकिंग/नूतनीकरण आणि नवीन यूजर नोंदणी बंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि आर-वॉलेट (R-Wallet) टॉप-अप सेवाही बंद करण्यात आली आहे. जरी हे ॲप अद्याप स्टोअरवर उपलब्ध असले, तरी त्याचे अपडेटेड व्हर्जन वापरणाऱ्यांना आर-वॉलेट रिचार्ज किंवा तिकीट बुक करता येणार नाही.

तुमच्या 'R-Wallet' मधील पैशांचे काय होणार?

प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दक्षिण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, UTS ॲपवरील तुमचा शिल्लक आर-वॉलेट बॅलन्स पूर्णपणे सुरक्षित राहील. हे पैसे लॅप्स होणार नाहीत, तर ते तुमच्या 'RailOne' ॲपवर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. 'RailOne' हे केवळ तिकीट बुकिंग ॲप नसून ते एक 'ऑल-इन-वन' प्लॅटफॉर्म आहे:

Advertisement

'RailOne' ॲपचे प्रवाशांना होणारे फायदे

  1. आरक्षित (Reserved), अनारक्षित (Unreserved) आणि प्लॅटफॉर्म तिकीट एकाच ॲपवरून बुक करता येईल.
  2. पीएनआर स्टेटस तपासणे, तिकीट रद्द करणे आणि रिफंड स्टेटस पाहणे आता सोपे होईल.
  3. प्रवाशांना त्यांच्या सीटवर IRCTC मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून जेवण मागवता येईल.
  4. गाडीचे लाईव्ह रनिंग स्टेटस, कोच पोझिशन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक यांची रिअल-टाइम माहिती मिळेल.
  5. UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि आर-वॉलेटद्वारे सुरक्षित पेमेंट करता येईल.
  6. 'RailMadad' द्वारे तक्रारी आणि अभिप्राय नोंदवण्याची सोय यामध्ये एकात्मिक करण्यात आली आहे.

दक्षिण रेल्वेने प्रवाशांना त्यांचे सध्याचे IRCTC किंवा UTS क्रेडेंशियल्स (युझरनेम आणि पासवर्ड) वापरून 'RailOne' मध्ये लॉगिन करण्याचे आवाहन केले आहे. 1 मार्चनंतर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रवाशांनी लवकरात लवकर या नवीन ॲपवर शिफ्ट व्हावे, असे रेल्वेने म्हटले आहे.
 

Topics mentioned in this article