Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यामध्ये पीपलोदी येथे रविवारी (2 जून 2024) रात्री उशीरा ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाले आहेत. राजगडमधील जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जणांच्या डोके व छातीच्या भागामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना भोपाळमध्ये हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी पुढे असेही सांगितले की, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाही कारण गंभीर स्वरुपात जखमी असलेल्या दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ट्रॉलीमधील सर्व जण राजस्थानातून आलेल्या एका वरातीत सहभागी झाले होते.
राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
राजगड दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी 'X' वर पोस्ट करून म्हटलंय की, "मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. अपघातात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, याकरिता प्रार्थना करते".
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही X वर पोस्ट करत म्हटलेय की, "राजगड जिल्ह्यातील पीपलोदी रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील 13 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. राजस्थान पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत आणि काही गंभीर जखमींना भोपाळमध्ये पाठवले आहे".