Rajkot Nandini Bosamiya Suicide: 'बाबा मी आयुष्याची लढाई हरले आहे,'असे सोशल मीडिया स्टेटस ठेवत आम आदमी पक्षाच्या 21 वर्षांच्या महिला नेत्यानं स्वत:चं आयुष्य संपवलं. गुजरातच्या राजकोट शहरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. राजकोटमधील गोंडल रोडवरील परिन फर्निचरजवळ असलेल्या आगमन सिटीमध्ये नंदिनी आनंदभाई बोसमिया या तरुणीने रात्रीच्या वेळी आत्महत्या केली. नंदिनी ही मूळची जेतपूरच्या नवागड येथील राहणारी होती आणि तिने कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. दोन बहिणी आणि एका भावाच्या कुटुंबात ती सर्वात मोठी होती.
काय आहे प्रकरण?
नंदिनी ही जुनागडच्या अस्लम नावाच्या एका विवाहित तरुणाच्या प्रेमात पडली होती. 27 ऑक्टोबर 2025 रोजी नंदिनी घरातून निघून गेली होती आणि अस्लमसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी राजकोटला आली होती. अस्लमचे यापूर्वीच लग्न झालेले असून त्याला एक मुलगाही आहे. या दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता.
हा कौटुंबिक वाद इतका वाढला होता की सुमारे 5 महिन्यांपूर्वी जुनागडमध्ये असलमची पत्नी, मावशी आणि इतर नातेवाईकांसह 5 जणांनी नंदिनीवर जीवघेणा हल्ला देखील केला होता. या हल्ल्याबाबत जुनागड सी-डिव्हिजन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

सोशल मीडियावर वडिलांसाठी शेवटचा संदेश
हल्ल्याच्या या घटनेनंतर अस्लम आणि नंदिनी गेल्या सुमारे 5 महिन्यांपासून राजकोटमध्ये एक भाड्याची खोली घेऊन एकत्र राहत होते. मात्र या नात्यात नंदिनीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
मृत तरुणीच्या बहिणीने केलेल्या आरोपानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी नंदिनीने तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये सांगितले होते की, तिचे सोन्या-चांदीचे सर्व दागिने अस्लमने गहाण ठेवले आहेत. मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेल्या नंदिनीने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवले होते, ज्यामध्ये तिने लिहिले होते, बाबा, मी आयुष्याची लढाई हरले आहे.
नंदिनीच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, अस्लम आणि त्याचे कुटुंब गेल्या काही काळापासून नंदिनीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. याच छळाला कंटाळून त्यांच्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या तालुका पोलिसांनी वडिलांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: 'सियाला कधी पाहिलंच नाही! माझा मुलगा तर दुकानात...' आरोपी चेतनच्या वडिलांचा मोठा दावा! )
बहिणीचा अत्यंत धक्कादायक आरोप
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि गंभीर आरोप मृत नंदिनीच्या बहिणीने केला आहे. बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी घर सोडून अस्लमसोबत राहू लागली, तेव्हा अस्लमने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अस्लमने नंदिनीला सांगितले होते की, माझे आधीच लग्न झाले असून मला एक मूल आहे, त्यामुळे मला भविष्यात दुसरे मूल नको आहे. असे सांगून त्याने नंदिनीला विश्वासात घेतले, तिला जाळ्यात ओढले आणि तिचे ऑपरेशन करून तिचे गर्भाशयच काढून टाकले.
गेल्या सुमारे 1 महिन्यापासून नंदिनी अनेकदा आपल्या बहिणीला सांगायची की, अस्लम आणि त्याच्या कुटुंबाचा छळ आता असह्य झाला आहे. अस्लमची साथ सोडून एकटी राहण्याची आणि नोकरी करून नवीन आयुष्य सुरू करण्याचा तिचा विचार होता. त्या पद्धतीने ती योजनाही आखत होती. मात्र, ती आपल्या या निर्णयावर अंमलबजावणी करू शकली नाही आणि त्यापूर्वीच प्रचंड मानसिक तणावामुळे तिने मृत्यूला कवटाळले. पोलीस आता या गर्भाशय काढून टाकण्याच्या आरोपाची आणि प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )
आम आदमी पार्टीकडून लढवली होती निवडणूक
नंदिनी बोसमिया 2025 साली झालेल्या पालिका-पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने जेतपूर-नवागड नगरपालिकेची निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत तिचा पराभव झाला होता. तिचे वडील आनंदभाई हे देखील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत. एका तरुण महिला नेत्याचा असा संशयास्पद आणि वेदनादायी अंत झाल्याने राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world