यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Lohagad Murder Case: पुणे येथील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. लोहागड किल्ल्यावरून दरीत ढकलून केतनची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याची नियोजित बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. या हायप्रोफाइल हत्याकांडात नवनवे खुलासे होत असतानाच, आता या प्रकरणाला एक वळण मिळाले आहे. या संपूर्ण वादात आता पहिल्यांदाच संशयित आरोपी चेतन चौधरी याच्या कुटुंबीयांनी समोर येत आपली भूमिका मांडली आहे आणि पोलिसांच्या दाव्यांना थेट आव्हान दिले आहे.
चेतनचे काका काय म्हणाले?
चेतन चौधरीचे काका उदाराम चौधरी यांनी समोर येत चेतनवर झालेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. आमच्या मुलाला या हत्या प्रकरणात नाहक फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. उदाराम चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये जे काही दाखवले जात आहे, ते पूर्णपणे एकतर्फी आहे.
चेतन हा अत्यंत साधा आणि सरळ मुलगा असून त्याला लहानपणापासून खेळाची प्रचंड आवड आहे. त्याचे कोणाशीही वैर नव्हते आणि तो असे क्रूर कृत्य कधीही करू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Pune News : हत्येनंतर 4 दिवस सुरु होतं कपटी सियाचं नाटक... केतनच्या बहिणीनं पकडलं खोटं, वाचा नेमकं काय घडलं? )
आम्ही सिया गोयलला ओळखतच नाही!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाच्या दुकानाच्या शेजारीच चेतनचे दुकान होते आणि तिथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले होते. मात्र, चेतनच्या कुटुंबीयांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. उदाराम चौधरी यांनी स्पष्ट केले की, आम्ही सिया गोयल किंवा तिच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही ओळखत नाही.
टीव्ही आणि वर्तमानपत्रातील बातम्या पाहिल्यानंतरच आम्हाला सिया हे नाव पहिल्यांदा समजले. चेतनने सियाबद्दल कधीही घरात किंवा कोणाशीही काहीही सांगितले नव्हते, तसेच त्याच्या आई-वडिलांनाही याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आम्हाला मान्य नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे? )
न्यायालयीन लढाई लढणार
हा संपूर्ण प्रकार म्हणजे चेतनला अडकवण्याचा एक कट असल्याचे सांगत चौधरी कुटुंबाने आता कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. आमचे मार्केटमध्ये कोणाशीही वैर नाही आणि मृत केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाशीही आमचा कधीही कोणताही संबंध आला नव्हता, असे उदाराम चौधरी यांनी स्पष्ट केले. सिया गोयलने चेतनला यात फसवले आहे का, या प्रश्नावर त्यांनी थेट बोलणे टाळले असले, तरी चेतनची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असून वकिलांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे कुटुंबीयांनी चेतन निर्दोष असल्याचा दावा केला असला, तरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तपास अतिशय वेगाने सुरू आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचे लग्न ठरल्यामुळे हे दोन्ही आरोपी अस्वस्थ होते आणि त्यांनी अत्यंत थंड डोक्याने केतनचा काटा काढण्याची योजना आखली होती. या प्रकरणात आता पोलिसांचा तांत्रिक तपास आणि आरोपींच्या कुटुंबीयांचे दावे समोरासमोर आल्याने न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world