गोव्याची पाण्याची चिंता मिटली, साळावली धरण 11 दिवस आधीच ओव्हरफ्लो

गोव्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद वाळपोई येथे करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पणजी:

रुपेश सामंत

गोवेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोव्याला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण असलेले साळावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून मुसळधार पाऊस होत असून गोव्यामध्येही दमदार पाऊस झाला आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्रीपासून जोर पकडला होता. शनिवारी कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं होतं. साळावली धरणाला अनोख्या पद्धतीचा 'डकबिल स्पिलवे' आहे म्हणजेच धरणातील अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विहिरीसदृश्य रचना आहे. त्यातून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. 

11 दिवस आधीच ओव्हरफ्लो

गेल्या वर्षी हे धरण 19 जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी हे धरण 11 दिवस आधीच म्हणजे ८ जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले. साळावली धरण हे गोव्यातील सर्वाधिक क्षमतेचे धरण आहे. साळावलीसह गोव्यासाठी महत्त्वाची असणारी सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. साळावली धरणातून बाहेर पडणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या धरणाकडे वळू लागली आहेत. 

वाळपोईत सर्वाधिक पावसाची नोंद

गोव्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद वाळपोई येथे करण्यात आली आहे. इथे 24 तासांत 1804 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दाबोळीम येथे 24 तासांत  1184 मिमी पाऊस झालाय तर पणजी येथे  360.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात कमी पावसाची नोंद क्यूपेम येथे करण्यात आली असून इथे 24 तासांत 175 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
 

Topics mentioned in this article