लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात आलेल्या इंडिया आघाडीत निवडणुका संपताच टोकाचे वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले होते. दिल्ली विधानसभा निवडणुपूर्वी या आघाडीतील वाद हे शिगेला पोहोचले होते. इंडिया आघाडीत सामील असलेल्या विविध राज्यातील पक्षांनी या आघाडीच्या नियमित बैठका व्हायला हवा, एकत्रित कार्यक्रम देशभर राबवायला हवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ही आघाडी विस्कळीत झाल्याचे दिसू लागले होते. काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी या आघाडीबाबत एक मोठे विधान केले आहे. ही आघाडी अद्याप आहे की नाही हे माहिती नाही असे त्यांनी म्हटले. कोणतीही आघाडी ही निवडणुकीच्या काळात तयार होत नसते ती दोन निवडणुकांदरम्यानच्या 5 काळात वाढवावी लागत असते असे चिदंबरम यांनी गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले होते. याच कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, मला माहिती नाही की इंडिया आघाडी ही शाबूत आहे की नाही.
गुरुवारी दिल्लीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना चिदंबरम यांनी म्हटले की, इंडिया आघाडी शाबूत आहे की नाही मला माहिती नाही, कदाचित सलमान खुर्शिद यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. सलमान खुर्शिद हे इंडिया आघाडीच्या चर्चांमध्ये सामील असल्याने त्यांना याबाबत अधिक माहिती असेल असे चिदंबरम यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की इंडिया आघाडी ही शाबूत असेल तर मला त्याचा आनंद होईल पण मला असे दिसते आहे की ही आघाडी अत्यंत कमजोर झाली आहे.
नक्की वाचा : भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार
चिदंबरम यांनी भाजपबाबत बोलताना म्हटले की,इतिहासावर नजर टाकल्यास असा एकही पक्ष दिसत नाही जो इतका संघटीत आहे. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मजबूत दिसतात. भाजप पक्ष म्हणजे एक राजकीय पक्ष नसून ते एका यंत्रामागचे यंत्र आहे. ही यंत्रणा भारतातील सगळ्या यंत्रणांना नियंत्रित करण्याची ताकद बाळगून आहे. हाच धागा पकडत भाजप नेत्यांनी चिदंबरम आणि काँग्रेसला चिमटे काढण्यास सुरूवात केली आहे. भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की भाजप पक्ष देशाला प्राधान्य देतो आणि सगळ्या भारतवासीयांची काळजी करतो. चंद्रशेखर पुढे म्हणाले की, इंडी आघाडी ही भ्रष्टाचार, शोषणाबद्दलची आसक्ती, पंतप्रधान मोदींविरोधातील द्वेष, भीती आणि घृणेमुळे एकत्र आलेल्या पक्षांची आघाडी आहे.