Father Kills Newborn Daughter: आई जिवाच्या आकांताने मृत्यूशी झुंज देत आयसीयूमध्ये (ICU) पडलेली होती, तर काही तासांपूर्वीच जन्माला आलेली चिमुकली जगात पहिले पाऊल ठेवून निरागसपणे श्वास घेत होती. मात्र, मुलगी झाली या एकाच क्रूर आणि नराधम विचाराने पेटून उठलेल्या बापाने सर्व मर्यादा ओलांडल्या. दूध पाजण्याच्या बहाण्याने या निर्दयी बापाने स्वतःच्याच काही तासांच्या चिमुरडीचा गळा आवळून अतिशय निर्घृणपणे खून केला. वंशाला दिवा हवा या अमानुष हव्यासापोटी घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे सर्वच स्तब्ध झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील निम्स (NIMS) रुग्णालयात हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पिता रवी कुमार यादव (वय 34) याला आधीच 2 मुली होत्या. तिसऱ्यांदा मुलगाच व्हावा अशी त्याची तीव्र इच्छा होती. 27 जुलै रोजी त्याने गरोदर पत्नी कोमलला रुग्णालयात दाखल केले होते.
29 जुलै रोजी सिझेरियन डिलिव्हरीद्वारे पत्नीने एका निरोगी आणि गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर पत्नीची तब्येत खालावल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, तर नवजात बाळाला वेगळ्या वॉर्डात ठेवले होते. तिसऱ्यांदाही मुलगीच झाल्याचे समजताच आरोपी रवीच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली.
( नक्की वाचा : Pune News: कास पठाराची हवा पुण्याच्या पोलिसांना भारी पडली! तपासाच्या नावाखाली केला भलताच पराक्रम )
बाळाला दूध पाजण्याच्या बहाण्याने आवळला गळा
बुधवारी भल्या पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास आरोपी बापाने नवजात बाळाला आईकडे दूध पाजण्यासाठी घेऊन जातो, असा बहाणा केला. बाळाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने वॉर्डातच कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने त्या चिमुरडीचा गळा आवळून जीव घेतला. काही वेळाने जेव्हा रुग्णालयातील परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी बाळाची पाहणी करण्यासाठी आले, तेव्हा त्यांना बाळ हालचाल करत नसल्याचे दिसून आले. त्यांनी संशयावरून बापाकडे कडक चौकशी केली असता, त्याने स्वतःच्याच लेकीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली. निष्पाप बाळाचा मृतदेह एका कपड्याच्या पोटलीत बांधून तिचे आजोबा रुग्णालयाच्या आवारात आपल्या आरोपी मुलाला शोधत हताशपणे भटकत होते. या घटनेची माहिती मिळताच चंदवाजी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने निम्स रुग्णालयात दाखल झाले.
( नक्की वाचा : Video Call Murder: पत्नीला गळफास देत असताना पतीने केला व्हिडिओ कॉल; जन्मदात्यांसमोरच संपवला लेकीचा जीव )
पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ सुनीता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची बिहारची असलेली कोमल हिचा विवाह 2021 मध्ये रवी यादव याच्याशी झाला होता. 2022 मध्ये त्यांना पहिली आणि 2024 मध्ये दुसरी मुलगी झाली. आरोपी रवी नीमराणा येथील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतो. मुलगाच हवा या हव्यासापोटी त्याने पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world