- मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर डबरा येथे सामूहिक विवाह सोहळ्यात मोठा गोंधळ झाला
- संसारोपयोगी साहित्य आणि दुचाकी न मिळाल्यामुळे नवरी थेट पोलीस स्थानकात पोहोचली
- विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या समितीने प्रत्येक जोडप्यांकडून नोंदणीसाठी १०,००० रुपये घेतले होते
लग्न लागलं. कुटुंबीय खुष होते. नवरा नवरी ही लग्नानंतर आनंदी होती. वरात निघणार होती. पण तेवढ्यात नवरी मुलगी आक्रमक झाली. तिने सासरी जाण्या ऐवजी आधी पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वांनाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नवरीने घेतलेल्या या निर्णयाचंनंतर सर्वांनीच कौतूक केलं. त्याला कारण ही तसचं होतं. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर नववधू सासरी जाण्याऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर डबरा येथे ही घटना घडली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांनी दिलेल्या आश्वासनावरून हा सर्व हायव्होल्टेज ड्रामा सर्वांनाच पाहाता आला.
या विवाह सोहळ्यात संसारोपयोगी साहित्य आणि दुचाकी देण्याचं आश्वास नवरी मुलीला देण्यात आलं होतं. त्यामुळे नवरा-नवरी लग्नासाठी तयार झाले होते. पण लग्न झाल्यानंतर यापैकी काहीच मिळालं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नववधूने विदाईपूर्वीच पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. जोपर्यंत हक्काची दुचाकी मिळत नाही, तोपर्यंत सासरी जाणार नसल्याचा पवित्रा या नववधूने घेतला आहे. त्यामुळे पोलीसांसमोर ही मोठा पेच निर्माण झाला. आता करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. सर्व वऱ्हाड यावेळी पोलीस स्टेशन बाहेर जमलं होतं.
डबरा येथे 'ईशानी शिक्षा आणि जनकल्याण समिती'च्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मोठी आश्वासनं देण्यात आली होती. खास करून या जोडप्यांना गृहोपयोगी साहित्या देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यात एक बाईक देणार असं ही सांगितलं होतं. त्यामुळे अनेकांनी या विवाह सोहळ्यात नोंदणी केली होती. नोंदणी करताना वधू आणि वराकडून 10,000 रुपयांचे शुल्क घेण्यात आले होते. मात्र, विवाह संपन्न झाल्यानंतर जेव्हा साहित्याची मागणी करण्यात आली, तेव्हा आयोजकांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
नववधू लवली वाल्मीकी हिने सांगितले की, गोलू नरवरिया नावाच्या व्यक्तीने लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय लग्नानंतर दुचाकी दिली जाईल असं ही सांगण्यात आलं होतं. त्यासाठी मात्र 10000 रुपये घेतले होते. विदाईची वेळ येताच आयोजक तिथून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूने अंगावरचा भरजरी पोशाख आणि हातातील मेहंदीसह थेट डबरा सिटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची दखल घेत एसडीओपी सौरव कुमार यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आयोजकांनी साहित्य वेळेत न पोहोचल्याचे कबूल केले असून, ते लवकरच सुपूर्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वादावर तात्पुरता पडदा पडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world