राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीला आणि लहान मुलीला 3 दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर शोधणाऱ्या एका व्यावसायिकाचा शोध अखेर दु:खद पद्धतीने संपला. मागितलाल देवासी (35) यांच्या पत्नी पुष्पा देवी (32) आणि 5 वर्षांची मुलगी रवीना यांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ झुडपांमध्ये सापडले. या घटनेमुळे बासड़ा-धनजी गावात शोककळा पसरली आहे.
जालोरचे रहिवासी असलेले मांगीलाल देवासी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे मोबाइल ॲक्सेसरीजचा व्यवसाय करतात. कुटुंबासह सासरवाडीतील लग्नासाठी ते 9 नोव्हेंबर रोजी पत्नी पुष्पा, मुलगा धर्मेंद्र 9 आणि मुलगी रवीना 5 यांच्यासह अहमदाबादला जाण्यासाठी ट्रेनने निघाले होते. रात्री 11:30 वाजता यादगिरी आणि नालवर दरम्यान, रवीना बाथरूमला गेली. हात धुताना ती ट्रेनच्या बाहेरील मोकळ्या दरवाज्यातून घसरली.
त्यावेळी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आई पुष्पा देवी यांचाही तोल गेला. दोघीही धावत्या ट्रेनमधून खाली पडल्या. मध्यरात्री 12 च्या सुमारास मांगीलाल यांना जाग आली. तेव्हा पत्नी आणि मुलगी जागेवर नव्हत्या. त्यांनी लगेच रायचूर जीआरपी ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. स्वतः दिव्यांग असूनही, मांगीलाल यांनी मुलगा आणि दोन भावांसह 3 दिवस सतत ट्रॅकच्या कडेला पायी शोध घेतला. पण त्यांना त्या दोघींचा ही पत्ता लागला नाही. त्यानंतर ही त्यांचा शोध हा सुरूच राहीला.
मात्र 13 नोव्हेंबरला गुरे चारणाऱ्या मुलांना झाडीत दोन मृतदेह दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. ज्यावरून मांगीलाल यांनी मृतदेहांची ओळख पटवली. पोस्टमॉर्टममध्ये धक्कादायक बाब समोर आली की, पुष्पा देवी या 5 महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यानंतर मांगीलाल यांना आणखी धक्का बसला. एकाच वेळी एकाच कुटुंबातील दोन नाही तर तीन जीव गेले. यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.