देवा राखुंडे
पुरंदर विमानतळाबाबत अजूनही काही गोष्टी मार्गी लागत नाहीत. विमानतळाला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यात जमिन संपादीत केली जात आहे. शिवाय शेतकऱ्यांची समजूत ही काढली जात आहे असा दावा प्रशासनाने केला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ म्हणून पुरंदर येथे हे विमानतळ साकार होत आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला सध्या ब्रेक लागला आहे. प्रशासनाने प्रति एकर 1 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी मोठी आहे. त्यांनी ही आपली मागणी आता पुढे केली आहे.
शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यांनी त्यासाठी मोठा मोबदलाही मागितला आहे. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी या मोबदल्यात पाच पट वाढ करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने घर, गोठा, विहीर आणि झाडे यासारख्या मालमत्तेसाठी त्यांच्या किंमतीच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. पुणे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूसंपादनासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुरंदरसाठी सात गावांमधील एकूण 3,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
सध्या प्रति एकर 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आता प्रति एकर 4 कोटी ते 7 कोटी रुपयांपर्यंत मोबदल्याची मागणी केली आहे. हा मोबदला पाट पण आहे. भूसंपादनाच्या वाटाघाटी 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाचे उद्दिष्ट आहे की, नुकसानभरपाईची पूर्तता डिसेंबर 2025 पासून सुरू करावी. शिवाय ही संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारी 2026 पर्यंत संपवावी असं प्रशासनाने ठरवलं आहे.
प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास 2026 च्या पहिल्या तिमाहीतच बांधकामाच्या निविदा काढल्या जातील. हे विमानतळ फक्त पुणेच नव्हे, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. यामध्ये 4,000 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद अशा दोन समांतर धावपट्ट्या असणार आहेत. ज्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांसाठी उपयुक्त ठरतील. या प्रकल्पामुळे पॅरासिटी क्षेत्रात व्यावसायिक संकुले, हॉटेल्स आणि लॉजिस्टिक्स सुविधांसह रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि पर्यटनाचे केंद्र बनेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world