- बिहारमधील भभुआ येथे मंचुरियन आणि कढई पनीर खाल्ल्यानंतर २० वर्षीय तरुणाचा फूड पॉइझनिंगमुळे मृत्यू झाला आहे
- तरुणाला जेवणानंतर उलट्या आणि अस्वस्थता सुरू झाली व सकाळी रुग्णालयात पोहोचता त्याचा मृत्यू झाला
- उन्हाळ्यात उष्णतेमुळे अन्नात बॅक्टेरियाची वाढ होते आणि अर्धवट शिजवलेले किंवा अस्वच्छ अन्न विषबाधेचे कारण ठरते
Food Poisoning: उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच खानपानातील थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो, याची धक्कादायक घटना बिहारमधील भभुआ येथे घडली आहे. हॉटेलमधून मागवलेले मंचुरियन आणि कढई पनीर खाल्यानंतर एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हॉटेलच्या चमचमीत जेवणाची आवड एका तरुणाच्या जिवावर बेतली आहे. मंचुरियन आणि कढई पनीर खाल्ल्यानंतर काही तासांतच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जेवणानंतर तरुणाला उलट्यांचा त्रास सुरू झाला. सकाळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पण डॉक्टरांनी हा प्रकार गंभीर अन्नबाधेचा असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने रात्री साडेदहाच्या सुमारास बाहेरून मागवलेले जेवण केले. त्यानंतर त्याला सतत उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. प्रकृती खालावल्याने पहाटे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू 'फूड पॉयझनिंग'मुळे (अन्नबाधा) झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने अन्नामध्ये बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते. अस्वच्छ भांडी, दूषित पाणी किंवा अर्धवट शिजवलेले अन्न यामुळे संसर्ग पसरतो. तसेच शिजवलेले अन्न दीर्घकाळ बाहेर ठेवल्यास त्यात जंतू निर्माण होतात.
बाहेरून अन्न मागवताना ते 30 ते 40 मिनिटांच्या आत खावे. उन्हाळ्यात चटणी किंवा सॉस टाळणे हिताचे ठरते, कारण ते तयार करताना वापरलेले पाणी दूषित असू शकते. अन्न नेहमी व्यवस्थित गरम करूनच खावे. उन्हाळ्यात ओलाव्यामुळे अन्नात जिवाणू लवकर वाढतात. अन्न फ्रिजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास ते विषारी होऊ शकते. पनीर किंवा भाज्या नीट न शिजवल्यास त्यातून विषबाधा होऊ शकते. बाहेरचे पदार्थ खाताना ते गरम आहेत की नाही आणि पॅकिंग व्यवस्थित आहे का, याची खात्री करा. शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळा.
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. बिहारमध्ये एका 20 वर्षीय युवकाचा हॉटेलमधील मंचुरियन आणि पनीर खाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आहाराबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंपाक करताना काय खबरदारी घ्याल याकडे एक लक्ष टाकूयात. भाज्या नेहमी धुवून वापरा आणि किचनमधील स्वच्छतेवर भर द्या. मंचुरियन किंवा पनीरसारखे पदार्थ आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले असावेत. सॉस, क्रीम किंवा मसाल्यांची 'एक्सपायरी डेट' नक्की तपासा. उरलेले अन्न त्वरित फ्रिजमध्ये ठेवा. बाहेरून मागवलेले अन्न जास्त वेळ तसेच ठेवू नका. पॅकिंग उघडे असल्यास अन्न घेऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाहेरील चटण्या टाळा, कारण त्यातून संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. उन्हाळ्यातील थोडीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवू शकते.