- रुपेश सामंत
Goa Accident: गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत शनिवारी (25 मे 2024) बस दुर्घटनेमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. रस्त्यालगत असणाऱ्या झोपडीमध्ये खासगी बस घुसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. साखरझोपेत असतानाच झोपडीतील मजुरांवर काळाने घाला घातला. यातील चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आलीय. पोलीस उप-अधीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार की, "बस चालक भरत गोवेकर कार्टोलीम गावचा रहिवासी आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये दुर्घटनेच्या वेळेस तो दारूच्या नशेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली गेली आहे".
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा इंडस्ट्रिअल इस्टेट येथे रस्ते बांधणीचे काम करणारे मजूर झोपडीमध्ये झोपले होते. यावेळेस रोझमबर्गर नावाच्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस त्यांच्या झोपडीमध्येच घुसली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीररित्या जखमी झालेल्या पाच जणांवर गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी (25 मे 2024) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे".
नक्की वाचा: Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप
रुपेंद्र कुमार माथूर यांचे काका रमेश माथूर आणि भाऊ अनिल माथूर यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रुपेंद्र कुमार माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार,"बस थेट झोपडीमध्येच घुसली. बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. यानंतर अपघाताबाबत कोणाकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही बस चालकाने आम्हाला दिली. तसेच घटनास्थळी वैद्यकीय मदत उशिराने पोहोचल्याने पीडितांना मडगावातील जिल्हा रुग्णालयात नेण्यास उशीर झाला." असा दावा देखील रुपेंद्र यांनी केला आहे.
(नक्की वाचा: आग, धूर आणि किंकाळ्या! 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12 मुलांचा समावेश; PM मोदींनी व्यक्त केला शोक)
दरम्यान रुपेंद्र देखील झोपडीतच होते. पण फोनवर बोलण्यासाठी ते झोपडी बाहेर आले होते आणि थोडक्यात त्यांचे आयुष्य बचावले.
(नक्की वाचा : Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक)