उत्तर भारतामध्ये सूर्याचा प्रकोप सुरु आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेतील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढलाय. राज्यातही अनेक ठिकाणी उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये हवामान विभागानं एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. केरळच्या किनाऱ्यावर वरुणराजाने भारताचा दरवाजा ठोठावायला सुरुवात केलीय. येत्या 24 तासात केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुधवारी (29 मे) सकाळी वामान विभागाने जारी केलेल्या उपग्रहाच्या चित्रांवरून मान्सूनचं आगमन पुढील २४ तासात केरळच्या किनाऱ्यावर होईल असं स्पष्ट दिसंतय. दरम्यान, केरळच्या किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. आज त्यामुळे मान्सूनचं आगमन किमान 24 तास आधीच होण्याची चिन्हं आहेत. पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना ही माहिती दिलीय.
मे महिन्याचे 2-3 दिवस शिल्लक आहेत. मात्र लोकांना उष्णतेच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळू शकलेला नाही. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात राज्यात उष्णतेचा कहर आहे. मंगळवारी दिल्लीने उष्णतेच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले. येथील नजफगढ भागातील पारा 49.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. आतापर्यंतचं हे सर्वात जास्त तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस सुर्य अशाच प्रकार आग ओकत राहील.
(नक्की वाचा : Delhi Heat Wave दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन )
आयएमडीने राजस्थानातील अनेक जिल्ह्यात उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. मंगळवारीदेखील राजस्थानातील अनेक भागात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. तर किमान तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात हा पारा कमी होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणत्या राज्यांना इशारा?
हवामान विभागानुसार, उत्तर प्रदेशासह देशातील अनेक भागात पंजाब, हरियाणा-चंदीगड, पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, बिहारमध्ये उष्णतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागेल. या राज्यात उष्णतेमुळे IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय लोकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असे निर्देश देण्यात आले आहेत.