- Eight family members, including the 24-year-old groom, died in a Bolero crash in Sambhal district
- The Bolero lost control and hit a college wall before overturning near Janata Inter College
- Ten family members were in the vehicle, which was overcrowded and travelling to a wedding ceremony
Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारी बोलेरो कार भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. जुनावरी येथील मेरठ-बदायूं रस्त्यावर हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जेवनई गावात ही घटना घडली. जनता इंटर कॉलेजजवळ बोलेरो कार वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार भिंतीला जाऊन धडकली. गाडीत दहा जण होते. सर्व कुटुंबातील सदस्य लग्न समारंभासाठी जात होते. अपघातात नवरदेव सूरज याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बोलेरो कारचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले. पण तोपर्यंत नवरदेव आणि त्याच्या मेव्हणीसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर नवरदेवाच्या बहिणीसह तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी आहेत. दोघांची प्रकृती देखील गंभीर आहे. त्यांना अलीगढ येथे रेफर करण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर, काही काळापूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती तिथे आता शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांना सांत्वन व्यक्त केले. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अपघाताबद्दल शोक व्यक्त करत म्हटलं की, "उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये दिले जातील. जखमींना ५०,००० रुपये दिले जातील."