Karnataka Viral News: कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यातील एका मंदिरातून एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. मंदिरातील दानपेटीत भक्त सहसा सुख, शांती, आरोग्य किंवा समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मात्र, कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंडल गावात एका वेगळ्याच प्रकारची 'नवस' पाहायला मिळाली. येथील हुलिकंटेश्वर मंदिराच्या दानपेटीत एका भक्ताने चक्क आपल्या सासूचा मृत्यू व्हावा, अशी लेखी प्रार्थना अर्पण केली आहे.
जत्रेच्या दानपेटीत सापडली नोट
मंदिरात नुकतीच जत्रा पार पडली होती. जत्रा संपल्यानंतर जेव्हा मंदिर प्रशासनाकडून दानपेटी उघडण्यात आली आणि चढावा मोजला जात होता, तेव्हा 100 रुपयांच्या एका नोटेने सर्वांचे लक्ष वेधले. या नोटेवर पेनाने एक संदेश लिहिलेला होता. "देवा, माझे दुःख दूर कर... माझी सासू पुढच्या वर्षीच्या जत्रेपूर्वी मरू दे," अशी प्रार्थना या नोटेवर लिहिलेली होती.
(नक्की वाचा- Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)
मंदिर प्रशासनही पडले पेचात
साधारणपणे भक्त नोकरी, घर किंवा मुलाबाळांच्या सुखासाठी चिठ्ठ्या टाकतात. मात्र, कोणाच्या तरी मृत्यूसाठी देवाला साकडे घालण्याचा हा प्रकार मंदिर कर्मचाऱ्यांसाठीही नवीन होता. ही नोट सुनेने लिहिली आहे की जावयाने, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, कारण नोटेवर कोणाचेही नाव किंवा पत्ता नव्हता. मंदिर व्यवस्थापनाने या घटनेला केवळ एक "विचित्र प्रार्थना" मानून सोडून दिले आहे. त्यांच्या मते, प्रत्येक भक्त आपल्या भावना व्यक्त करतो, ही देखील त्यातीलच एक पण चकित करणारी भावना आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway: 'मिसिंग लिंक'मुळे वेळ-अंतर वाचणार; टोल देखील अधिकचा द्यावा लागणार?)
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावात आणि सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींनी याला गंभीर कौटुंबिक वादाचा परिणाम म्हटले आहे, तर काहींनी हा कोणाचा तरी खोडसाळपणा किंवा विनोद असावा असे मत व्यक्त केले आहे.