मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विजय शाह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. सर्वोच्च न्यायालयानेही विजय शाह यांना फटकारलं.
'तुम्ही मंत्री आहात आणि अशा संवेदनशील काळात संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने विचारपूर्वक बोलले पाहिजे', अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंत्र्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. याशिवाय उच्च न्यायालयाने दिलेल्या FIR च्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडियन आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मध्यप्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील मंत्री विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्यांनी एक्सवर पोस्ट करीत म्हटलं, मी विजय शाह, मी केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी मी माफी मागतो.
नक्की वाचा - Operation Sindoor News: पाकिस्तानची खुमखुमी.. बॉर्डरवर सैन्याची जमवाजमव; संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानाबद्दल विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर मंत्री शाह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. विजय शहा यांच्या वकिलाने सांगितले की, उच्च न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकले नाही. मंत्री विजय शहा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.