Ahmedabad News: लग्नाच्या कार्यक्रमासाठी वेळेत ब्लाउज शिवून देण्याच्या आश्वासनाचे पालन न केल्यामुळे अहमदाबाद येथील एका टेलरला मोठा भुर्दंड भरावा लागला आहे. नवरंगपुरा येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अहमदाबादच्या ग्राहक विवाद निवारण आयोगाने टेलरला 7000 रुपयांहून अधिक रक्कम ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय घडले?
नवरंगपुरा येथील तक्रारदार महिलेने 24 डिसेंबर 2024 या तारखेला नातेवाईकांच्या लग्नसमारंभात परिधान करण्यासाठी एका टेलरकडे ब्लाउज शिवण्यास दिले होते. यासाठी सीजी रोडवरील दुकानात काम करणाऱ्या टेलरला त्यांनी 4395 रुपये आगाऊ दिले होते. टेलर वेळेवर काम पूर्ण करेल, या विश्वासावर त्यांनी ही रक्कम दिली.
14 डिसेंबर रोजी जेव्हा त्या ब्लाउज घेण्यासाठी गेल्या, तेव्हा ब्लाउज त्यांच्या मापानुसार शिवलेले नव्हते. टेलरने आणखी वेळ घेऊन ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र 24 डिसेंबर उलटून गेली तरी ब्लाउज तयार झाले नाही आणि ग्राहकाला ते मिळालेच नाही.
ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
महिलेने याबाबत ग्राहक आयोगात धाव घेतली. टेलरने आपली चूक मान्य करूनही ग्राहक आयोगाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे आयोगाने हे प्रकरण एकतर्फी चालवले. आयोगाने असा निर्णय दिला की, टेलरने ब्लाउज वेळेवर न देणे हे स्पष्टपणे 'सेवेतील त्रुटी' आहे आणि यामुळे तक्रारदाराला 'मानसिक त्रास' झाला आहे.
(नक्की वाचा- Vande Bharat Express: पुणेकर, सांगलीकरांसाठी गुडन्यूज! 'वंदे भारत'ला दोन नवीन थांबे)
आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "तक्रारदाराने आगाऊ पैसे भरले असतानाही, त्याने सेवा दिली नाही. त्याच्या सेवेत त्रुटी होती हे सिद्ध होते. तक्रारदाराने लग्नाच्या कार्यक्रमात परिधान करण्यासाठी ब्लाउजची ऑर्डर दिली होती, परंतु ते वेळेवर शिवले गेले नाही आणि यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास झाला हे सिद्ध झाले आहे."
ग्राहक आयोगाचे भरपाईचे आदेश
ग्राहक आयोगाने टेलरला 4,395 रुपये आगाऊ रक्कम वार्षिक 7% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. मानसिक त्रास आणि खटल्याच्या खर्चासाठी म्हणून अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल. अशाप्रकारे टेलरला लगावण्यात आलेला एकूण दंड 7000 रुपयांहून अधिक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world