Tamil Nadu Election 2026 Result : तामिळनाडूच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाचा उदय झाला असून 'थलपती' विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला आहे. विजय यांच्या पक्षाने केलेली ही एतिहासिक कामगिरी केवळ एका सुपरस्टारची क्रेझ नसून त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांवर मतदारांनी टाकलेला मोठा विश्वास असल्याचे दिसत आहे. अनेक दशकांपासून डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांभोवती फिरणारे तामिळनाडूचे राजकारण आता टीव्हीकेच्या या झंझावातामुळे पूर्णपणे बदलले आहे.
महिलांसाठी आश्वासनांचा पाऊस
तामिळनाडूतील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी थलपती विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या होत्या, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून येत आहे. कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2500 रुपये मानधन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
याशिवाय, वर्षाला 6 गॅस सिलिंडर मोफत देणे, महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग आणि विशेष महिला न्यायालये स्थापन करण्याचे वचन दिले. नवविवाहित वधूंना सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी, तसेच मुलीच्या जन्मानंतर आर्थिक मदत अशा योजनांनी महिलांचा विश्वास जिंकण्यात विजय यांना यश आले आहे.
( नक्की वाचा : West Bengal: बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत,आता मुख्यमंत्री कोण होणार? सुवेंदू अधिकारींसह 'हे' आहेत दावेदार )
तरुणांसाठी रोजगार आणि भत्त्यांची हमी
बेरोजगारीच्या मुद्द्यावर विजय यांनी तरुणांना साद घालणारे अनेक निर्णय जाहीरनाम्यात घेतले होते. पदवीधर तरुणांना कौशल्य प्रशिक्षणादरम्यान दरमहा 10000 रुपये आणि बेरोजगार पदवीधरांना दरमहा 4000 रुपये भत्ता देण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले होते.
तसेच पदविका धारकांसाठी 2500 रुपये आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी 8000 रुपये मदतीची घोषणा केली गेली. गावपातळीवर 500000 तरुणांना 'मुख्यमंत्री जनसेवा सहयोगी' म्हणून सामावून घेऊन त्यांना 18000 रुपये पगार देण्याची योजना तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे.
( नक्की वाचा : Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला )
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालताना विजय यांनी सहकारी बँकांमधील शेती कर्ज माफीचे आश्वासन दिले होते. धान्यासाठी 3500 रुपये आणि उसासाठी 4500 रुपये प्रति क्विंटल इतका किमान आधारभूत भाव (MSP) देण्याचे वचन त्यांनी दिले. यासोबतच शेतमजूर आणि कुळांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी विशेष अधिकार कार्ड देण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती, ज्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांनी टीव्हीकेला मोठी पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे.
शिक्षण आणि प्रशासकीय सुधारणांचे मॉडेल
शिक्षणासाठी विजय यांनी 12 वी पासून पीएचडी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये पर्यंतचे विनासायास शैक्षणिक कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' आणि नागरिकांसाठी विशेष 'प्रिव्हिलेज कार्ड' अशा आधुनिक सुविधांचे वचन त्यांनी दिले होते.
थिरुक्कुरलच्या तत्त्वांवर आधारित 'प्रामाणिक प्रशासन' देण्याची त्यांची भाषा मतदारांना भावली असून यामुळेच तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात एका नव्या शक्तीचा उदय झाला आहे.