जाहिरात

West Bengal: बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत,आता मुख्यमंत्री कोण होणार? सुवेंदू अधिकारींसह 'हे' आहेत दावेदार

West Bengal Election Results 2026 : ऐतिहासिक विजयानंतर आता बंगालचा पहिला भाजपा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून राजकीय वर्तुळात पाच ते सहा नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

West Bengal: बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत,आता मुख्यमंत्री कोण होणार? सुवेंदू अधिकारींसह 'हे' आहेत दावेदार
West Bengal Election Results 2026 : बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?
मुंबई:

West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एक नवा इतिहास लिहिला गेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून डावे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसचा गड राहिलेल्या या राज्यात आता पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्तेचे द्वार उघडले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता बंगालचा पहिला भाजपा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून राजकीय वर्तुळात पाच ते सहा नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विजयाचे शिल्पकार सुवेंदू अधिकारी शर्यतीत आघाडीवर

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पहिलं आणि वजनदार नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षात सभागृहात आणि रस्त्यावर ममता बॅनर्जी यांना जेरीस आणले आहे. नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन महत्त्वाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. 

तृणमूल काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव होता आणि जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना राज्याची धुरा देऊ शकतो.

( नक्की वाचा : Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला )

संघटनात्मक मजबुती देणारे शमिक भट्टाचार्य आणि दिलीप घोष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य हे देखील या शर्यतीतील एक महत्त्वाचे नाव मानले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले भट्टाचार्य हे अभ्यासू आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

दुसरीकडे, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांच्याच काळात भाजपने बंगालमध्ये मोठी झेप घेतली होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड मजबूत असून आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

उत्तर बंगालचा चेहरा निशिथ प्रामाणिक

उत्तर बंगालमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाचे श्रेय निशिथ प्रामाणिक यांना दिले जाते. माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रामाणिक यांनी कोचबिहार आणि आसपासच्या भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट केली आहेत. तरुण आणि डॅशिंग नेता म्हणून त्यांची ओळख असून उत्तर बंगालला प्रतिनिधीत्व देण्यासाठी पक्ष त्यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी यावेळी माथाभांगा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

2 महिला नेत्यांची नावं चर्चेत

भाजपाने बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार केला, तर अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांची नावे आघाडीवर आहेत. अग्निमित्रा पॉल या असनसोल दक्षिणच्या आमदार असून त्यांनी पक्षाचे अनेक लढे आक्रमकपणे लढवले आहेत. दुसरीकडे, अभिनेत्री आणि माजी राज्यसभा खासदार रूपा गांगुली यांचा शहरी मतदारांमध्ये मोठा प्रभाव आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्या पक्षात सक्रिय असून महिला आघाडीत त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. सध्या त्या सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

बंगालच्या गादीवर कोण बसणार याचे उत्तर लवकरच दिल्लीतील भाजप हायकमांडकडून मिळण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक विजयाने बंगालच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली असून आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या रूपाने राज्याला एक नवी दिशा मिळणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com