जाहिरात

Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला

Who is Suvendu Adhikari? : कधीकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारी आज याच विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले आहेत.

Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी?  ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला
Suvendu Adhikari : बंगालमधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार सुवेंदू अधिकारी कोण आहेत?
मुंबई:

West Bengal Election Results 2026: पश्चिम बंगालच्या राजकारणात 4 मे रोजी सकाळी एका नव्या पर्वाचा उदय झाला आहे.पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज करत मोठा इतिहास घडवला आहे. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख होताच ज्या नावाचा जयघोष आज संपूर्ण देशात होत आहे, ते नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. कधीकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारी आज याच विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले आहेत.

बंगालमधील सत्तापरिवर्तनाचा चेहरा

सुवेंदू अधिकारी हे केवळ एक राजकारणी नसून ते जमिनीवर काम करणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपले शिक्षण पीके कॉलेज, कांथी येथून पूर्ण केले आणि त्यानंतर प्रसिद्ध रवींद्र भारती विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली. उच्चशिक्षित असलेले सुवेंदू अधिकारी एका शक्तिशाली राजकीय कुटुंबातून येतात. 

त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. पूर्व मेदिनीपूर परिसरात या कुटुंबाचा इतका दबदबा आहे की त्यांना तिथले राजकीय राजे मानले जाते. सुवेंदू यांनी नगरसेवक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली आणि 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

( नक्की वाचा : Bengal Results: ममता बॅनर्जींच्या पराभवाचे 5 अर्थ! तृणमुल काँग्रेसच्या पराभवाने पुढचे राजकारण कसे बदलेल? )

नंदीग्राम आंदोलनाने मिळवून दिली खरी ओळख

पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात ज्या नंदीग्राम आंदोलनाचा मोठा वाटा होता, त्याचे नेतृत्व सुवेंदू अधिकारी यांनीच केले होते. 2007 मध्ये जेव्हा इंडोनेशियन कंपनीसाठी जमीन अधिग्रहित केली जात होती, तेव्हा त्यांनी भूमी उच्छेद प्रतिरोध समिती स्थापन करून लढा दिला. 

या आंदोलनामुळेच ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांचे समीकरण घट्ट झाले आणि 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर सुवेंदू यांनी केंद्रात खासदार म्हणूनही काम केले आणि पुढे राज्याच्या मंत्रिमंडळात परिवहन आणि सिंचन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली.

मैत्रीचे रूपांतर संघर्षात आणि भाजपचा प्रवेश

एक काळ असा होता जेव्हा सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते मानले जायचे. मात्र, पक्षात अभिषेक बॅनर्जी यांचे वाढते महत्त्व आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी झालेले मतभेद यामुळे सुवेंदू अधिकारी नाराज झाले.

अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि डिसेंबर 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने बंगालच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलून टाकली.

ममता बॅनर्जींचा पराभव आणि ऐतिहासिक विजय

2021 च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय गुरु ममता बॅनर्जी यांनाच नंदीग्राममध्ये पराभूत करून सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. 2026 च्या या निवडणुकीत त्यांनी केवळ नंदीग्रामच नाही, तर ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्येही त्यांना कडवे आव्हान दिले. 

ममता बॅनर्जी यांनी त्यांना बाहेरचा उमेदवार म्हटले, तरीही सुवेंदू यांनी स्वतःला भूमीपुत्र म्हणवत बंगालच्या जनतेचा विश्वास जिंकला. आज  बंगालमध्ये जे सत्तापरिवर्तन झाले आहे, त्यामागे सुवेंदू अधिकारी यांची अचूक रणनीती आणि जनसंपर्क सर्वात महत्त्वाचा ठरला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com