Tirupati Laddu:खळबळजनक! तिरुपतीच्या लाडवात बाथरूम क्लीनरचं केमिकल? मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

Tirupati Laddu Controversy: तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tirupati Laddu Controversy: . आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई:

Tirupati Laddu Controversy: तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलेले तूप हे चक्क बाथरूम साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सपासून बनवण्यात आले होते असा आरोप नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा तिरुपती प्रसादाच्या शुद्धतेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

काय केला आरोप?

कुरुनूल जिल्ह्यातील येम्मिगनूर येथे आयोजित एका जाहीर सभेत मुख्यमंत्री नायडू बोलत होते. यावेळी त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराची पवित्रता जगन सरकारने भंग केली असून तब्बल 5 वर्षे केमिकलपासून बनवलेल्या तुपातून गोविंदाचा प्रसाद तयार केला गेल्याचे त्यांनी सांगितले. 

हे तूप बनवण्यासाठी ज्या घटकांचा वापर झाला ते प्रामुख्याने बाथरूम क्लीनरमध्ये वापरले जातात असा गंभीर दावा त्यांनी यावेळी केला आहे.

( नक्की वाचा : UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले, OBC आणि EWS बाबत मोठे अपडेट, वाचा A to Z माहिती )

आधीचे आणि आताचे लाडू यात मोठा फरक

या सभेत बोलताना नायडू यांनी प्रसादाच्या दर्जावरही भाष्य केले. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना तपास यंत्रणांनी क्लीन चिट दिल्याचे दावे केले जात असले तरी, टीटीडीचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनीच प्रसादातील भेसळीची कबुली दिली होती याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. 

जगन सरकारने तिरुमाला तिरुपति देवस्थानम अपवित्र केल्यानंतर आता परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या मिळणारे लाडू आणि आधीचे लाडू यांच्या दर्जात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे नायडू यांनी सांगितले. 

Advertisement

फेब्रुवारी महिन्यात झाली होती मोठी कारवाई

तिरुपती लाडू भेसळ प्रकरणी याआधीही मोठी कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भोले बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा आणि एआर डेअरीचे राजू राजशेखरन यांचा समावेश होता. लाडूच्या तुपात प्राण्यांची चरबी वापरल्याचे आरोप झाल्यानंतर एसआयटी आणि सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.

( नक्की वाचा : Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा )

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात चंद्रबाबू नायडू यांनी पहिल्यांदा प्राण्यांच्या चरबीचा उल्लेख केला होता, तेव्हापासूनच आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. आता बाथरूम क्लीनरच्या केमिकलचा उल्लेख केल्यामुळे हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. भक्तांच्या श्रद्धेशी खेळ केल्याचा आरोप करत नायडू यांनी जगन सरकारला लक्ष्य केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article