- राजस्थानमध्ये शीतला अष्टमीच्या दिवशी गाढवांची पूजा करून त्यांना पंचपक्वान्न दिली जातात
- महिलांनी शीतला माता मंदिरात जाऊन पूजा केली आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते
- ब्यावर शहरासह राज्यभर बास्योंडा या सणाच्या दिवशी शिळे पदार्थ तयार करून मातेला नैवेद्य दाखवले जाते
काही सण, काही परंपरा या खरोखर अनोख्या असतात. भारतात तर काही परंपरा या आज ही पाळल्या जातात. नव्या पिढीसाठी या परंपरा वेगळ्याच आणि तितक्याच आकर्षक ही वाटतात. अशीच एक परंपरा आहे. ज्यात चक्क गाढवांची चंगळ असते. यात गाढवांची पुजा केलीच जाते, पण त्यांना पंचपक्वानं ही खाण्यासाठी दिली जातात. गाढवांना सजवलं जातं. ही परंपरा आज ही राजस्थानमध्ये पाळली जाते. निमित्त असतं 'शीतला अष्टमी'च्या सणाचं. हा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात येतो.
या दिवशी प्रथेनुसार महिलांनी शीतला माता मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली. विशेष म्हणजे, या उत्सवात शीतला मातेचे वाहन असलेल्या गाढवाची पूजा करून त्याला विविध पक्वान्न भरवण्याची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही पाळण्यात आली. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आजारांपासून मुक्तीसाठी महिलांनी यावेळी प्रार्थना केली. ब्यावर शहरासह संपूर्ण राज्यात 'बास्योंडा' ही परंपरा साजरी केली गेली. यामध्ये सणाच्या एक दिवस आधी विविध प्रकारचे शिळे पदार्थ तयार केले जातात.
शीतला अष्टमीच्या दिवशी मातेला या शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील आजार दूर होतात, अशी भाविकांची धारणा आहे. जयपूरच्या चाकसू येथील शील डुंगरी मंदिरात ऐतिहासिक लख्खी मेळाव्याला सुरुवात होते.सुमारे 600 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचतात. सुरक्षेसाठी प्रशासन आणि पोलिसांनी 240 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष ही ठेवले आहे. सण कोणताही असो, त्यात प्राण्यांना मिळणारा मान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतो. राजस्थानमध्ये शीतला अष्टमीनिमित्त चक्क गाढवांची 'बल्ले-बल्ले' झाली. मातेचे वाहन असलेल्या गाढवाची महिलांनी मनोभावे पूजा केली आणि त्याला आवडीचे पदार्थ खायला दिले.
सूरजपोल गेट परिसरात आयोजित मेळ्यामध्ये मुलांची मोठी गर्दी दिसून आली. विशेषतः मातीची खेळणी आणि ईसर-गणगौरच्या मूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घराघरात आदल्या दिवशी बनवलेले पदार्थ खाऊन हा सण साजरा झाला. चाकसू येथील प्रसिद्ध शील डुंगरी मंदिरात आजही जुनी परंपरा जपली जाते. या ठिकाणी मातेला पहिला नैवेद्य राजघराण्याकडून आलेल्या प्रसादाचा दाखवला जातो. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हा सण पाहण्यासाठी पर्यटक ही या ठिकाणी येत असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world