उलटलेला टँकर चुकवताना दोन ST बसची समोरासमोर भीषण धडक, एक बस पेटली; 8 प्रवाशांचा मृत्यू

सूरतमध्ये महाराष्ट्रातील एसटीच्या दोन बसची समोरासमोर जबर धडक झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Surat Bus Accident : गुजरातच्या सूरतमध्ये एक मोठा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील एसटीच्या दोन बसची समोरासमोर जबर धडक झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र डेपोची बस धुळेहून नवापूरमार्गे सुरतला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच बसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. दलाकडून बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सूरतच्या बारडोलीमधील उवा गावाजवळ झाला. महाराष्ट्रातील दोन एसटीच्या बस समोरा-समोर आल्या आणि त्यांच्यात धडक झाली.  

डिव्हायडर ओलांडून बसची भीषण धडक...

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एसटी बस डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला, येथे समोरून येणाऱ्या बसला धडक बसली. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन्ही बसची टक्कर झाल्यानंतर एक बस उलटली आणि तिने पेट घेतला. अग्निशमन दल, वैद्यकीय आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

Advertisement

नक्की वाचा - मुलाचा सांगाडा पाहून बाप ढसाढसा रडला; अडीच महिन्यांनी 12 वर्षांच्या गणेशच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन्ही बसचे क्रमांक MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 असे आहेत. या दोन्ही बस महाराष्ट्रातील आहेत. एक उलटलेला टँकर चुकवण्याचा प्रयत्न करत असताना बसचा हा अपघात झाला. टँकरला धडकण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस डिव्हायडर ओलांडून विरुद्ध लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. दोन्ही बस भरधाव वेगाने जात होत्या. रस्त्याच्या कडेला उलटल्याने एका बसने पेट घेतला. सर्व जखमींना बारडोलीमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.