- दिल्ली विमानतळावर आकाशा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानांचे टॅक्सी-वेवर पंख एकमेकांना घासले
- दोन्ही विमानांमध्ये झालेल्या किरकोळ धडकेत जीवितहानी झाली नाही, पण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
- स्पाईसजेटच्या विमानाचे उजवे विंगलेट खराब झाले असून आकाशा एअरच्या विमानाचे हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर निकामी झाले
देशातील सर्वात गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर गुरुवारी दुपारी एक थरारक घटना घडली. टॅक्सी-वेवर हालचाल करत असताना आकाशा एअर आणि स्पाईसजेट या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन विमानांमध्ये झालेल्या किरकोळ धडकेने मोठी खळबळ उडाली. आकाशा एअर आणि स्पाईसजेटची विमाने एकमेकांसमोर आल्याने हा अपघात झाला. सुदैवाने, विमानांचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
दुपारी जवळपास 14:15 च्या सुमारास टर्मिनल 1 वर ही दुर्घटना घडली. आकाशा एअरचे विमान (QP-1406) दिल्लीहून हैदराबादला जाण्यासाठी धावपट्टीच्या दिशेने जात होते. त्याच वेळी, लेहहून दिल्लीला आलेले स्पाईसजेटचे विमान (SG-124) पार्किंगच्या दिशेने येत होते. यादरम्यान दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. आकाशा एअरचे विमान झेपावण्याच्या तयारीत असताना आणि स्पाईसजेटचे विमान लँडिंग करून परतत असताना हा प्रकार घडला. दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना जोरात घासले गेल्याने मोठा आवाज झाला. यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात त्यांच्या B737-700 विमानाचे उजवे 'विंगलेट' खराब झाले आहे. तर आकाशा एअरच्या विमानाचे 'हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर' निकामी झाले आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून स्पाईसजेटचे विमान तातडीने थांबवण्यात आले असून त्याची तांत्रिक तपासणी केली जात आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या अपघातानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्पाईसजेटच्या विमानाचे उजवे विंगलेट या अपघातात पूर्णपणे चेंदामेंदा झाले आहे. सध्या हे विमान दिल्ली विमानतळावरच थांबवण्यात आले असून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या गंभीर चुकीला जबाबदार कोण, याचा शोध आता घेतला जात आहे. दरम्यान सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.