- विनोद कांबळी यांना मेंदूत रक्ताच्या गाठीमुळे ब्रेन स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण झाला आहे
- त्यांच्या स्मरणशक्तीवर मोठा परिणाम झाला असून विस्मरणामुळे ते अनोळखी लोकांकडे सिगरेट मागत आहेत
- न्यूरोसर्जन डॉ. आदिल छागला यांच्या देखरेखीखाली विनोद कांबळी यांच्यावर उपचार सुरू आहेत
भारतीय क्रिकेटमधील एकेकाळचा झंझावाती फलंदाज विनोद कांबळी सध्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळपट्टीवर झुंज देत आहे. मेंदूतील रक्ताच्या गाठीमुळे त्यांना 'ब्रेन स्ट्रोक'चा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या विस्मरणाच्या आजाराने चिंता वाढवली आहे. त्याच्या जवळच्या मित्राने ही माहिती दिली आहे. आधीच विनोद कांबळी वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत आहेत. यात आता ब्रेन स्ट्रोकची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत त्यांचा मित्र सचिन तेंडुलकरसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. विनोदसाठी हे सर्व दिग्गज क्रिकेटपटून पुढे सरसावले आहेत. विनोदला काही करून या स्थितीतून बाहेर काढण्याचा या सर्वांचा मानस आहे.
विनोद कांबळी याच्या मेंदूत रक्ताची गाठ (Clot) असून, ती वेळीच उपचार न मिळाल्याने आता काढणे कठीण झाले आहे. न्यूरोसर्जन डॉ. आदिल छागला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे कांबळी यांची स्मरणशक्ती क्षीण झाली असून त्यांना साध्या गोष्टींचेही भान राहत नसल्याचे त्यांचे मित्र मार्कस कौटो यांनी सांगितले. मेंदूच्या आजारामुळे कांबळी यांना 'ब्रेन स्ट्रोक'चा इशारा देण्यात आला असून, त्यांची स्मरणशक्तीही त्यांना साथ देईनाशी झाली आहे.
कांबळी विस्मरणापोटी रस्त्यावर लोकांकडे सिगरेट मागतात, जी त्यांच्या प्रकृतीसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना सिगरेट देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटूंच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे त्यांना गुप्तपणे आर्थिक मदत पुरवली जात असल्याची माहिती ही समोर आली आहे. कांबळी यांना नेमका काय आजार आहे, हेच ते विसरून जात आहेत. मद्यपान सोडले असले तरी, विस्मरणापोटी ते अनोळखी व्यक्तींकडे सिगरेट मागतात. लोकही प्रेमापोटी त्यांना सिगरेट देतात, पण हीच बाब त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
कांबळी यांची आर्थिक ओढाताण पाहून मार्कस कौटो आणि इतर माजी क्रिकेटपटूंनी एक मदत गट तयार केला आहे. हा एक वॉट्सअप ग्रुप आहे. नाव प्रसिद्ध न करता अनेक दिग्गज खेळाडू त्यांना उपचार आणि दैनंदिन गरजांसाठी मदत करत आहेत. कांबळी यांनी भारतासाठी 17 कसोटीत 1084 धावा आणि 104 वन-डे सामन्यात 2477 धावा केल्या आहेत. सध्या हाच धडाकेबाज खेळाडू गंभीर प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करत आहे. मेंदूतील गुंतागुंत आणि विस्मरणाच्या आजारामुळे त्यांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या काळात क्रिकेट विश्वातील त्यांचे सहकारी आणि मित्र त्यांच्या मदतीसाठी एकत्र आले आहेत.
प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते, कांबळी यांच्या मेंदूतील रक्ताची गाठ काढणे आता तांत्रिकदृष्ट्या कठीण झाले आहे. यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका असून स्मरणशक्तीवर मोठा परिणाम झाला आहे. काही काळापूर्वीच त्यांनी युरिनरी इन्फेक्शनवर यशस्वी मात केली आहे, मात्र मेंदूचा त्रास अद्याप कायम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा सर्वात जलद गाठण्याचा विक्रम आजही कांबळींच्या नावे आहे. विनोद कांबळीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी संकलन आणि वैद्यकीय सल्ल्याची देवाणघेवाण सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world