एअर इंडिया एक्स्प्रेसच्या तब्बल 300 कर्मचाऱ्यांनी आजारपणाचं कारण सांगत सामूहिक सुट्टी घेतल्यानंतर हवाई क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर कंपनीसह प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला होता. 9 मे रोजी कंपनीने सामूहिक रजा घेणाऱ्या तब्बल 30 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. आता एअर इंडिया एक्स्प्रेसकडून कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.
सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हजर न राहणाऱ्यांविरोधात व्यवस्थापनाकडून कारवाई केली जाणार आहे. सायंकाळीच टाऊनहॉलमध्ये मीटिंग घेण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देण्यात आला असून सायंकाळी चार वाजेपर्यंत रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Big News! 300 कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई
या सर्व प्रकारानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसकडून 8 मे रोजी 70 ते 80 उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आल होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी 9 मे रोजी तब्बल 30 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या कारवाईत अधिक जणांची वाढ होईल अशीही माहिती होती.
आजही उड्डाणं रद्द...
एअर इंडिया एक्स्प्रेसमधील गोंधळाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. गुरुवारीही एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जी उड्डाणं रद्द करण्यात आली त्यात चेन्नई ते कलकत्ता, चेन्नई ते सिंगापूर आणि त्रिचे ते सिंगापूर फ्लाइट्सचा समावेश आहे. तर लखनऊ ते बंगळुरू फ्लाइट उशिरा आहे. कर्मचाऱ्यांच्या बंडखोरीमागे नोकरीतील नव्या अटी असल्याचं सांगितलं जात आहे.