उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका नामांकित शाळेत फेअरवेल कार्यक्रमात 'चौमीन' खाण्यावरून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईने सर्वांनाच थक्क केले आहे. शाळेच्या 'फेअरवेल पार्टी'मध्ये एकापेक्षा जास्त वेळा चौमीन खाल्ल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना चक्क दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील चिनहट भागातील सेंट मेरी स्कूलमध्ये हा क्षण नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कटू अनुभव ठरला आहे. फावल्या वेळात नाश्ता करण्यासाठी लावलेल्या चौमीन काउंटरवर 3-4 वेळा गेल्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
व्हॉट्सॲप व्हॉईस नोटद्वारे निलंबन
शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही कारवाई करण्यासाठी चक्क शाळेच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला. त्यांनी पाठवलेल्या व्हॉईस नोटमध्ये म्हटले की, "हे मेसेज त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे चौमीन काउंटरवर गोंधळ घालत होते. ज्यांनी 3 ते 4 वेळा चौमीन खाल्ले आणि ते खाताना हातांचा वापर केला, अशा विद्यार्थ्यांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात येत आहे." या मेसेजमध्ये पुढे असेही म्हटले होते की, निलंबनाचा काळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घ्यायचे की नाही, हे नंतर याच ग्रुपवर कळवले जाईल.
(नक्की वाचा- Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!)
विद्यार्थ्यांना काठीने हाकलल्याचा आरोप
निलंबन जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले असता, त्यांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी असाही आरोप केला आहे की, मुख्याध्यापकांनी त्यांना काठी घेऊन शाळेबाहेर हाकलले. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर निषेध व्यक्त केला.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)
शाळेचे स्पष्टीकरण
प्रकरण वाढल्यानंतर आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यावर शाळा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. शाळेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, गेल्या 25 वर्षांत शाळेत असा प्रकार घडला नव्हता. विद्यार्थ्यांनी फूड काउंटरवर गैरवर्तन केल्यामुळे ही शिस्तभंगाची कारवाई होती. वाद वाढल्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येण्यास सांगितले आहे.