रस्त्यांवरील खड्डे अनेकदा अपघातांना निमंत्रण देतात, पण उत्तर प्रदेशातील एका घटनेत रस्त्यावरील खड्डा'देवदूत' ठरला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केलेल्या म्हणजेच जवळपास मृत घोषित केलेल्या महिलेला घरी नेत असताना, रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे चक्क जीवदान मिळाले आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
पिलीभीत येथील न्यायालयीन विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 50 वर्षीय विनीता शुक्ला 22 फेब्रुवारी रोजी घरी काम करताना अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने बरेली येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांचा ग्लासगो कोमा स्केल (GCS) 15 पैकी केवळ 3 वर आला होता. डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारल्या होत्या, जे मेंदू मृत झाल्याचे लक्षण होते. डॉक्टरांनी जगण्याची आशा नसल्याचे सांगून डिस्चार्ज दिला. पती कुलदीप कुमार शुक्ला आणि कुटुंबीय विनीता यांचा 'देह' घेऊन घरी निघाले होते.
(नक्की वाचा- पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)
रस्त्यावरील खड्ड्यामुळे चमत्कार झाला
24 फेब्रुवारी रोजी रुग्णवाहिका बरेली-हरिद्वार महामार्गावरून जात असताना हाफिजगंजजवळ एका मोठ्या खड्ड्यात आदळली. खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला इतका मोठा झटका बसला की विनीता यांच्या शरीराची हालचाल झाली. पती कुलदीप यांच्या लक्षात आले की, विनीता यांनी अचानक नैसर्गिकरीत्या श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तात्काळ घरी फोन करून अंत्यसंस्काराची तयारी थांबवण्यास सांगितली आणि विनीता यांना पिलीभीतच्या न्यूरोसिटी हॉस्पिटलमध्ये नेले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मत
न्यूरोसिटी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. राकेश सिंह यांनी विनीता यांच्यावर उपचार केले. त्यांनी सांगितले की, विनीता यांच्या रक्तामध्ये आणि लिम्फॅटिक सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर 'न्यूरोटॉक्सिन' आढळले होते. योग्य निदान आणि उपचारामुळे त्या आता पूर्णपणे शुद्धीवर आल्या असून बोलू लागल्या आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)
विनीता यांचे पती कुलदीप म्हणाले, "हा केवळ चमत्कार आहे. माझ्या पत्नीने खऱ्या अर्थाने मृत्यूवर विजय मिळवला आहे. खड्ड्यामुळे बसलेल्या त्या धक्क्याने तिची नाडी पुन्हा सुरू केली."