जाहिरात

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

Iran-US War: अमेरिका आणि इरानमधील युद्ध समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 84 डॉलरच्या खाली आले आहे.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय बनलेले अमेरिका-इराण युद्ध अखेर 107 दिवसांनंतर संपुष्टात आले आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक शांतता करारावर सहमती दर्शवल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतून कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती आता पूर्णपणे संपली आहे. या मोठ्या घडामोडीचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांहून अधिक मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे आता भारतातील सर्वसामान्यांनाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळणार का, अशी आशा निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त

सोमवारी आशियाई बाजारात व्यवहार सुरू होताच कच्च्या तेलाच्या किमती वेगाने खाली आल्या. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडचे भाव 4.39 टक्क्यांनी कोसळून 81.15 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर पूर्वी 87 डॉलरच्या वर व्यापार करणारे ब्रेंट क्रूड थेट 4 टक्क्यांनी घसरून 84 डॉलरच्या खाली आले आहे.

(नक्की वाचा- Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रूथ सोशल'वर या कराराला दुजोरा देत जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' पुन्हा खुला करण्याची आणि नौदलाची नाकेबंदी हटवण्याची घोषणा केल्यामुळे बाजारात ही मोठी नरमी पाहायला मिळत आहे.

भारतात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?

ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड ऑईलचे दर कमालीचे घसरले असले, तरी भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी आज, 15 जून रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. देशातील प्रमुख महानगरांमध्ये आजचे दर जुन्याच पातळीवर स्थिर आहेत.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?

मागच्या महिन्यात 15 मे नंतर अवघ्या दोन आठवड्यांत भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटर 7.50 रुपयांची मोठी दरवाढ झाली होती. या दरवाढीमुळे होरपळलेल्या भारतीय ग्राहकांना आता आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे दिलासा मिळण्याची आशा आहे. जागतिक बाजारातील ही घसरण अशीच कायम राहिल्यास, येत्या काही दिवसांत सरकारी तेल कंपन्या देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com