Jhansi Medical College Fire: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 नोव्हेंबर) भीषण आग (Jhansi Medical College Fire) लागली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली. या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खिडक्या फोडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी परिस्थितीचा घेतला आढावा
भाजप आमदार राजीव सिंह पारीछा म्हणाले की, ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. आगीमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. जवळपास 35 बाळांना वाचवण्यात आले. जखमी नवजात बाळांवर डॉक्टर सर्वोत्तम उपचार करत आहेत. सरकार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्याही संपर्कात आहेत. प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे म्हटले जात आहे.
झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले की, 10 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी झाले आहेत.
दुर्घटनेचा तपास करण्यासाठी समिती स्थापित
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बातचित करताना म्हटले की, मेडिकल कॉलेजमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 10.30 ते 10.45 वाजेदरम्यान नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बाहेरील भागामध्ये असणाऱ्या जवळपास सर्वच लहान मुलांना वाचवण्यात आले. पण आतमध्ये असणाऱ्या 10 नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेचा तपास करण्यासाठी मंडळ आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वामध्ये समिती स्थापित करण्यात आलीय.
आगीमध्ये गुदमरून आणि होरपळून नवजात बाळांचा मृत्यू
झाशी नगर क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नगर) ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या लहान मुलांच्या वॉर्डमधील 10 मुलांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 हून अधिक लहान मुलांना वाचवण्यात आले आहे. आगीवरही नियंत्रण मिळवण्यात आले. वॉर्डमध्ये एकूण 47 नवजात बाळ होते, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक
"झाशीमधील मेडिकल कॉलेजच्या NICU दुर्घटनेमध्ये मुलांचा झालेला मृत्यू अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या आत्म्यांना मोक्ष मिळो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, अशी प्रभू श्री राम चरणी प्रार्थना", असे म्हणत CM योगी आदित्यनाथांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शोक व्यक्त केला.