प्रत्येक बाप त्याच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करतो. तिची लग्नाची वरात ही जास्तीत जास्त चांगली असेल, लेकीच्या आयुष्यातील खास दिवस आणखी स्पेशल होईल यासाठी तो आयुष्यभर जमा केलेली पुंजी खर्च करण्यासाठी तयार असतो. या वडिलांनी मुलीची चक्क घटस्फोटानंतर मिरवणूक काढलीय. 'आम्ही मुलीला ज्या पद्धतीनं निरोप दिला होता तसंच तिला परत घेऊन आलो आहोत. तिनं त्याच जोमानं नव्या आयुष्याला सुरुवात करावी, ही आमची इच्छा आहे,' अशी भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केलीय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा प्रकार घडलाय. अनिल कुमार असं या मुलीच्या वडिलांचं नाव आहे. ते बीएसएनलमध्ये कर्मचारी आहेत. त्यांची मुलगी उर्मी नवी दिल्लीतल्या पालम विमानतळामध्ये इंजिनिअर आहे. उर्मीचं 2016 साली एका कॉम्पयुटर इंजिनिअरशी लग्न झालं होतं. त्यानंतर हे जोडपं दिल्लीमध्ये राहत होतं. त्यांना एक मुलगी देखील आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी छळवणूक करत असल्याचा आरोप उर्वीनं केलाय. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कोर्टानं 28 फेब्रुवारी रोजी या जोडप्याच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं.
( नक्की वाचा : रिलेशनशिपमध्ये आहात? ‘या' 5 चुका कधीही करु नका, आयुष्यभर होईल पश्चाताप )
उर्वीनं याबाबत बोलताना सांगितलं की, 'मी आमचं नातं वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. पण, 8 वर्ष मारहाण, शोषण आणि अपमानित झाल्यानं माझी सहनशक्ती संपली.' 'मुलीला घरी घेऊन येताना मी बँड-बाजा मागवला होता. समाजानं लग्नानंतर मुलीकडं दुर्लक्ष करु नये. तिच्या अडचणी समजून घ्याव्यात, हा संदेश मला यामधून समाजाला द्यायचा होता,' असं उर्वीचे वडील अनिल यांनी सांगितलं.
'मी माझी मुलगी आणि नातीसोबत राहण्यासाठी आतुर आहे,' या शब्दात उर्वीची आई कुसुमलता यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनिल यांचे शेजारी इंद्रभान सिंह यांनी सांगितलं की, 'उर्वीचं दुसरं लग्न होत आहे, असं आम्हाला सुरुवातीला वाटलं. पण, नंतर आम्हाला तिच्या वडिलांच्या भावना समजल्या. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.' उर्वीनंही आई-वडिलांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. नवी सुरुवात करण्यापूर्वी एक ब्रेक घेणार असल्याचं तिनं यावेळी सांगितलं.