वैद्यकीय आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचा संताप आणि जंतर-मंतरवर आंदोलनाचा भडका उडाला आहे. अशातच उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून आणखी एक पेपर लीकची बातमी समोर आली आहे. 'वीर माधो सिंह भंडारी उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटी' (UTU) च्या इंजिनिअरिंग शाखेचे दोन पेपर कथितरित्या परीक्षांपूर्वीच बाहेर आल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही विषयांच्या परीक्षा तातडीने रद्द केल्या असून आरोपी प्राध्यापकाविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवालिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील असिस्टंट प्रोफेसर आशिष कुमार गुप्ता हे पेपर सेटर म्हणून प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करत होते. आरोपी प्राध्यापकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 8 जुलै रोजी होणाऱ्या 'मशीन लर्निंग फॉर इंटरनेट ऑफ थिंग्ज' या विषयाच्या परीक्षेचे मिळते-जुळते तब्बल 90% प्रश्न आपल्या कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले होते.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर चौकशी केली असता, एक पेपर आधीच लीक झाल्याचे निष्पन्न झाले, तर दुसरा पेपरही लीक झाल्याचा संशय असल्याने विद्यापीठाने दोन्ही पेपर रद्द केले.
कुलगुरू तृप्ता ठाकूर यांचे स्पष्टीकरण
उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू तृप्ता ठाकूर यांनी या घटनेवर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "या शिक्षकाने आपल्या 22 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण परीक्षेची गोपनीयता धोक्यात आणली. आम्ही विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेतील कामकाजासाठी आरोपी प्राध्यापकावर पुढील 7 वर्षांसाठी बंदी घातली आहे.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
तसेच, संबंधित कॉलेज प्रशासनाने केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी नसून त्यांच्यावरही कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. रद्द झालेले दोन्ही पेपर आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा घेतले जातील आणि त्यासाठीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल", असं कुलगुरूंनी स्पष्ट केलं.