'इच्छा तिथे मार्ग'... अस म्हटलं जातं, मात्र याची प्रचिती उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी आश्रित शाकमुरी (ट्रेन IAS) यांनी (SDM) सरकारी वाहनाच्या आत कोर्ट सुरु केले आणि सुनावणी देखील घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाराणसीच्या राजतलाब तहसीलमधील ही घटना आहे.
काय आहे प्रकरण?
SDM आश्रित शाकमुरी यांचा वकील संतोष चौबे यांच्याशी न्यायालयात एका फाइलवर आदेश देण्याबाबत वाद झाला होता. एसडीएमने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख निश्चित केल्यावर वकिलांनी त्यास विरोध करत बार असोसिएशनकडे तक्रार केली. यानंतर वकिलांनी कोर्टावर बहिष्कार टाकला आणि याचिकाकर्त्यांना कोर्टात जाऊ दिले नाही.
त्यानंतर शाकमुरी यांनी कोर्टाच्या बाहेर त्यांची कार पार्क केली आणि तिथून सुनावणी सुरू केली. कारच्या लाऊडस्पीकरद्वारे फिर्यादींना त्यांच्या फाईल क्रमांकासह बोलावण्यात आले आणि त्यांनी कारजवळ येऊन आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. ही अनोखी सुनावणी पाहण्यासाठी काही वकीलही बाहेर पडले.
याला वकिलांनी विरोध करत घोषणाबाजी सुरू केल्यावर काही ज्येष्ठ वकिलांनी एसडीएमकडे जाऊन त्यांची समजूत काढली. यानंतर सुमारे तासाभरानंतर एसडीएम पुन्हा कोर्ट रूममध्ये गेले.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत आहे. अधिकाऱ्यांना काम करायचे असेल तर ते प्रतिकूल परिस्थितीतही का करू शकतात, अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत. मात्र, अनेकजण त्यावर टीका करताना दिसले आणि अधिकार दाखवण्यासाठी हे केले गेले, असे म्हटलं.