काश्मीर हल्ल्यानंतरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या फोटोत पत्नी आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसून टाहो फोडतेय. हा फोटो पाहून लोक म्हणतायत हा फोटो आम्हाला आयुष्यभर वेदना देत राहील. फोटोत एक तरुणी दिसत आहे. ती नववधू आहे. तिच्या बाजूला तिच्या नवऱ्याचा मृतदेह आहे. नव्या जोडप्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याचा हा फोटो आहे. या एका फोटोत किती काय दडलं आहे. दुःख, अश्रू, संताप, हतबलता, उद्विग्नता, वेदना,क्रौर्य. एवढ्या सगळ्या भावनांना सामावून घेणारा पण निशब्द करणाराच हा फोटो आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
व्हायरल झालेला फोटो आहे हिमांशी आणि विनय नरवालचा. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी विनय यांना गोळ्या मारुन ठार केलं. विनय हे नौदलातला लेफ्टनंट होते. हल्ल्याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं. 16 एप्रिलला विनय-हिमांशीचं लग्न झालं. 19 एप्रिलला लग्नाचं रिसेप्शन झालं. खरं तर लग्नानंतर विनय आणि हिमानी हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार होते. पण स्वित्झर्लंडचा व्हिसा मिळाला नाही, म्हणून दोघांनी हनिमूनसाठी काश्मीर पक्कं केलं.
21 एप्रिलला विनय आणि हिमांशी काश्मीरमध्ये पोहोचले. दुसऱ्याच दिवशी विनय यांना दहशतवाद्यांनी मारलं.विनय हे मूळचे हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातले रहिवासी आहेत. बी टेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौसेनेत रुजू झाले होते. सध्या ते कोचीमध्ये तैनात होते. तर विनयची पत्नी हिमांशी ही गुरुग्रामची होती.ती सध्या पीएचडी करते आहे. विनयच्या मृत्यूनं नरवाल कुटुंबीयांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला आहे. तर हाताची मेहंती जाण्या आधीच हिमांशीवर विधवा होण्याची वेळ आली आहे.
1 मेला विनय यांचा वाढदिवस होता. काश्मीरहून परत आल्यानंतर विनय कुटुंबीयांबरोबर वाढदिवस साजरा करणार होता. मात्र विनयच्या ऐवजी त्याचा मृतदेह कोचीत पोहोचला. विनयचा मृतदेह कोचीमध्ये आणल्यावर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी विनयला श्रद्धांजली वाहिली. यावेळीही हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. हिमांशीचा आकांत काळीज पिळवटून टाकणारा होता. हिमांशी ही शेवटी सैनिकाचीच पत्नी. जय हिंद म्हणत तिनं पतीला सलामी दिली. ही दृष्ट पाहून संपूर्ण देश हळहळला. नव्या संसाराची सुरूवात होतेच तोच तो संपला होता.