अमेरिकेतून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत एका भारतीय जोडप्याला एका अनोळखी व्यक्तीने कथितपणे वांशिक टिप्पणी करत देश सोडण्यास सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसून भारतीय जोडप्याला काही प्रश्न विचारते. ती व्यक्ती विचारते की, ते भारतातून आले आहेत का? त्यावर भारतीय दाम्पत्य होकारार्थी उत्तर देतात. त्यानंतर ती व्यक्ती जोडप्याला अमेरिका सोडण्यास सांगते. ती व्यक्ती पुढे म्हणते की, जर भारत इतका चांगला आहे, तर तुम्ही अमेरिकेत का आलात? यावर जोडपं अत्यंत शांत राहते. ते म्हणतात, आम्ही जग फिरण्यासाठी आलोय. मात्र, यानंतर ती व्यक्ती अधिक आक्रमक होते आणि म्हणते, आम्हाला तुम्ही इथे नको आहात, आपल्या देशात परत जा...गेट आउट ऑफ माय कंट्री.
भारतीयांना अशा प्रकारे लक्ष्य करणं चुकीचं...सोशल मीडियावर संताप
एवढ्या प्रकारानंतरही ते भारतीय जोडपं शांतता राखतात. काहीच उलट उत्तर देत नाहीत. त्यांच्या या शांत आणि संयमी उत्तराने सोशल मीडियावरील लोकांची मने जिंकली असून त्यांचं कौतुक होत आहे. मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्सनी या घटनेला वर्णद्वेष आणि झेनोफोबिया (परकीय लोकांबद्दलचा द्वेष) याचं उदाहरण म्हटलं आहे. काही युजर्सच्या मते, अशा घटनांवर गप्प राहणे चुकीचं आहे, त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांचे मनोधैर्य वाढते.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना केलं टॅग...
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना टॅग केले आहे. रुबिओ यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, प्रत्येक देशात काही लोक वांशिक टिप्पण्या करतात, परंतु अमेरिका अशा गोष्टी खपवून घेत नाही. या घटनेने आणखी एक चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ ज्या व्हेरिफाइड अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ती व्यक्ती स्वतःला म्युझिक प्रोड्युसर म्हणवते. यापूर्वीही त्याने भारतीयांची खिल्ली उडवणारे व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर भारतीय विरोधी कंटेंटचा ट्रेंड वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.