दारुबंदी बिहार राज्यात पूर्णपणे लागू आहे. असं असतानाही, दारू तस्कर अवैध दारू व्यवसायासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. याचे ताजे उदाहरण नवादा जिल्ह्यात समोर आले आहे. जिथे पोलिसांनी एका घरातील शौचालयाच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली आहे. बुंदेलखंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेली टोला पार नवादा परिसरात ही आश्चर्यकारक कारवाई करण्यात आली. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अशा पद्धतीने दारूचा वापर होवू शकतो. त्या आधी झालेली ही कारवाई मोठी मानली जात आहे.
बुंदेलखंड पोलिस ठाण्याचे प्रभारी धनवीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेली टोला भागात अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने एका घरावर छापा टाकला. घराची तपासणी केली असता पोलिसांना एक अविश्वसनीय गोष्ट आढळली. दारू व्यावसायिकाने दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी चक्क घरातील शौचालयाच्या टाकीचा वापर केला होता.
पोलिसांनी या शौचालयाच्या टाकीतून 29 बाटल्या विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान दारू व्यावसायिक बिक्की कुमार याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अवैध व्यवसायाशी संबंधित अन्य वस्तूही ताब्यात घेतल्या असून, त्यात 5850 रुपये रोख आणि एक स्कूटीचा समावेश आहे. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, आरोपी बिक्की कुमारविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सध्या बिहारमध्ये निवडणूक प्रचार सुरू असल्याने, जिल्हा प्रशासन आणि पोलिस अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत आहेत. पूर्ण दारूबंदी असूनही नवादा जिल्ह्यात लपूनछपून दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे.