तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मोठ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगांमध्ये भक्तांना दर्शनासाठी तासन तास उभे राहावे लागते. भक्तांना त्रास होऊ नये, त्यांना दर्शन पटकन घेता यावे आणि मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी 'ब्रेक दर्शन' पद्धती सुरू करण्यात आली आहे. शिर्डीतील साई बाबा मंदिरामध्ये (Shirdi Sai Baba Temple Break Darshan) ही पद्धत सुरू करण्यात आली असून तमिळनाडूमधील मंदिरांमध्येही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
( नक्की वाचा: शिर्डीमध्ये VIP भाविकांसाठी 'दर्शन ब्रेक' व्यवस्था! साई संस्थानचा मोठा निर्णय )
ब्रेक दर्शन म्हणजे काय?
भक्तांना रांगेत फार काळ उभे न राहाता पटकन दर्शन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली ही सुविधा आहे. यामध्ये मंदिर संस्थानातर्फे अथवा प्रशासनातर्फे भेटीची वेळ भक्तांना निश्चित करून दिली जाते. ऑनलाईन दर्शनासाठी भक्त वेबसाईट किंवा ॲपवर त्याच्या सोईनुसार वेळ आणि तारीख बुक करू शकतो. त्याच वेळेवर भक्त जाऊन दर्शन घेऊ शकतो. या प्रणालीला ब्रेक दर्शन म्हटलं जातं. या मार्गाचा अवलंब केल्यास भक्तांना रांगेत उभे राहावे लागत नाही आणि मंदिरात होणारी गर्दीही टाळता येते. तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिरात 'ब्रेक दर्शन' पद्धती सुरू करण्यात आली होती, हळूहळू इतर मंदिरेही त्याचा अवलंब करू लागली आहेत.
( नक्की वाचा: गुरु पौर्णिमेनिमित्ताने साईनगरी, अक्कलकोट हाऊसफुल; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी )
कोणकोणत्या मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होणार ?
तामिळनाडूतील तीन मोठ्या मंदिरांमध्ये ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. यात पलानी मुरुगन मंदिर, तिरुचेंदुर मुरुगन मंदिर आणि तिरुवन्नामलई येथील अरुणाचलेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. लवकरच श्रीरंगम रंगनाथस्वामी मंदिर आणि समायपुरम मरिअम्मन मंदिर यांसारख्या इतर प्रमुख मंदिरांमध्येही ती सुरू केली जाईल. या मंदिरांमध्ये 'ब्रेक दर्शन' पद्धतीने दर्शन घेणाऱ्या भक्तांना प्रसाद, तीर्थ आणि आरती याचा लाभही बुकींग करताना मिळवता येऊ शकेल. उदाहरणार्थ, पलानी मुरुगन मंदिरात विशेष दर्शनासाठी 300 रुपये शुल्क असेल.यासाठी बुकींग करणाऱ्या भक्तांना पंचामृत, नारळ, फळं, भस्म (विभूती) हे पिवळ्या रंगाची कापडी पिशवीतून दिले जाईल.