
आज गुरुपौर्णिमेच्या (Guru Purnima 2025) निमित्ताने राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. शिर्डी, अक्कलकोट, गोंदवले या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक दरवर्षी मंदिरांमध्ये गर्दी करीत असतात. आजही हेच चित्र पाहायला मिळत आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीत (Guru Purnima Shirdi) साईभक्तांची अक्षरशः गर्दी उसळली आहे. संपूर्ण साईनगरी भक्तांनी दुमदुमली असून, साई मंदिर परिसरासह संपूर्ण शहर भक्तांच्या गर्दीने हाऊसफुल झालंय. साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी रात्रभर जागून रांग लावली असून, दर्शन रांग रस्त्यावर पोहोचल्याचं चित्र दिसतंय. विशेष म्हणजे, साई संस्थानने उभारलेली अद्ययावत दर्शन व्यवस्था या अफाट गर्दीपुढे अपुरी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवतंय. भाविकांच्या सोयीसाठी साई संस्थानकडून तात्पुरती मंडप व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. साईदर्शनासाठी सध्या सरासरी चार तासांचा कालावधी लागत असल्याचं समोर येतंय.
शिर्डीतील उत्सवाचा मुख्यदिवस
उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवार 10 जुलै रोजी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, 5.45 वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन व सकाळी 7.00 वाजता श्रींची पाद्यपुजा संपन्न होईल. सकाळी 9.00 ते 11.30 यावेळेत श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम होईल. तर, दुपारी 12.30 वाजता साईंची माध्यान्ह आरती होईल. सायंकाळी 7.00 वाजता धुपारती होईल. त्यानंतर सांय 7.30 ते 10.00 यावेळेत गायिका अनुराधा पौडवाल, साई संध्याचा कार्यक्रम, रात्रौ 9.15 वाजता साईबाबांची सुवर्ण रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असल्याने नित्याची चावडी पुजन होईल.
अक्कलकोटमध्ये भाविकांचा उत्साह..
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यांतून आलेले हजारो भक्त श्री स्वामींच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी पहाटे पासून रांगेत उभे आहेत. मंदिर परिसर फुलांनी आणि रोषणाईने सजवले गेले असून विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून गर्दीचे नियंत्रण राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु-शिष्य परंपरेला समर्पित असतो आणि स्वामी समर्थ हे अनेकांच्या दृष्टीने जीवनमार्गदर्शक असल्यामुळे या दिवशी त्यांचे दर्शन घेणे विशेष पुण्यप्रद मानले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world