Who is Bhavesh Bhai Bhandari: मोह-मायाचा त्याग करण्याच्या गोष्टी तुम्ही सर्वांनी नक्की ऐकल्या किंवा वाचल्या असतील. प्रत्यक्ष आयुष्यात या घटना कमीच घडतात. आज आम्ही तुम्हाला एका अब्जाधीशाबाबत सांगणार आहोत. त्यानं एरवी दंतकथा वाटणारी गोष्ट प्रत्यक्ष केली आहे. या उद्योगपतीनं कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि सर्व सुखसोयी सोडून सन्यांसी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याची जोरदार चर्चा आहे.
मुलांनीही घेतलाय संन्यास
भावेश भाई भंडारी असं या दानशूर उद्योगपतींचं नाव आहे. त्यांचा गुजरातमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. त्यांनी 200 कोटींची संपत्ती दान करुन संन्यासी होण्याचा निर्णय घेतलाय. जे सुख मिळण्यासाठी आपण दिवस-रात्र कष्ट करतो त्या सुखाचा त्याग करुन भावेश भाई यांनी संन्यासी होण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण भावेश भाई यांच्या मुलांनी यापूर्वीच सन्यास घेतला आहे.
जैन धर्माची घेणार दीक्षा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीनं जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सर्व भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. 2022 साली त्यांचा 16 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांच्या मुलीनं सन्यास घेतला होता. मुलांपासून प्रेरणा घेत भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीनं हा निर्णय घेतलाय. हिम्मतनगरमधील नदीकाठी 22 एप्रिल रोजी ते औपाचिकपणे संन्यास घेऊन नवं आयुष्य सुरु करतील.