Harun India Rich List 2024 : देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी हुरुन इंडियानं जाहीर केली आहे. या यादीमध्ये 1,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या 1539 भारतीयांचा समावेश आहे. या यादीमध्ये 21 वर्षांच्या तरुणाचाही समावेश आहे. कैवल्य वोहरा (Kaivalya Vohra) असं या तरुणाचं नाव असून या रिपोर्टनुसार त्याची संपत्ती 3,600 कोटींपेक्षा जास्त आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॉलेज ड्रॉप आऊट कसा बनला श्रीमंत?
कैवल्य वोहरा हा ऑनलाईन किराणा माल आणि इतर वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या झेप्टो (Zepto) या अॅपचे सह संस्थापक आहेत. 22 आदित पालिचा हे या कंपनीचे दुसरे सह संस्थापक असून त्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. पालिचा यांची संपत्ती 4,300 कोटी आहे.
कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा हे दोघंही स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॉम्पुटर सायन्सचे विद्यार्थी होते. या दोघांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडून स्वत:चं स्टार्चअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. कैवल्य आणि आदितनं झेप्टो हे किरानाकार्ट लॉन्च केलं. 2021 साली जगभरात कोरोना व्हायरसं थैमान सुरु असताना त्यांनी कमीत कमी वेळेत किराना सामानाचं ऑनलाईन डिलिव्हरी करण्याचं काम त्यांनी झेप्टोच्या माध्यमातून सुरु केलं.
( नक्की वाचा : Hurun India rich list 2024 : प्रत्येक 5 दिवसात एक नवा अब्जाधीश, मुंबईत सर्वाधिक श्रीमंत; भारतातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध )
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या अॅमेझॉन इंडिया, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि बिग बास्केट यांच्याशी स्पर्धा करत झेप्टोनं या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. बेंगळुरु, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या शहरात झेप्टोनं आता विस्तार केलाय.
कैवल्य व्होराचा 2022 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हुरुन इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश झाला होता. त्यानंतर दरवर्षी त्यांचा या यादीमध्ये समावेश होत आहे.
( नक्की वाचा : Unified Pension Scheme (UPS): प्रत्येक सरकारी कर्माचाऱ्याला माहिती हव्यात या 10 गोष्टी )
गौतम अदाणी पहिल्या क्रमांकावर
अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी आणि त्यांचे कुटुंबीय हुरुनच्या 2024 च्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 95 टक्के वाढीसह त्यांची संपत्ती 11.61 लाख कोटींच्या पार गेली आहे. हुरुनच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीनुसार, देशभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झालीय. सध्या 334 भारतीय अब्जाधीश आहेत. 13 वर्षांपूर्वीच्या यादीच्या सुरुवातीला असलेल्या अब्जाधीशांपेक्षा याचे प्रमाण सहापट जास्त आहे.
अभिनेता शाहरुख खानचा या यादीमध्ये पहिल्यांदाच समावेश झाला आहे. त्याची एकूण संपत्ती 7,300 कोटी असल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. चित्रपटक्षेत्रातून शाहरुखसह जूही चावला आणि तिचे कुटुंबीय, ऋतिक रोशन, करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांचाही श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश आहे.