Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी?

Dr Shyama Prasad Mukherjee : हा विजय पाहताना डॉ. मुखर्जी यांच्या आत्म्याला आज किती शांती मिळत असेल, असा विचार माझ्या मनात वारंवार येतोय, अशा भावूक शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dr Shyama Prasad Mukherjee : देशाच्या सुरुवातीच्या औद्योगिक धोरणाला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पण...
मुंबई:

Dr Shyama Prasad Mukherjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एका अशा नावाचा आवर्जून उल्लेख केला, ज्यांच्या विचारांवर भाजपाचा पाया रचला गेला आहे. ते नाव म्हणजे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी. हा विजय पाहताना डॉ. मुखर्जी यांच्या आत्म्याला आज किती शांती मिळत असेल, असा विचार माझ्या मनात वारंवार येतोय, अशा भावूक शब्दांत मोदींनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. बंगालच्या भूमीत कमळ फुलणे ही केवळ राजकीय घटना नसून, डॉ. मुखर्जी यांनी अनेक दशकांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची ती पूर्ती असल्याचे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.

अष्टपैलू विद्वान आणि तरुण कुलगुरू

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 रोजी कलकत्ता येथे एका विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर आशुतोष मुखर्जी हे नामवंत न्यायाधीश आणि शिक्षणतज्ज्ञ होते. डॉ. मुखर्जी यांचे शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले आणि त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. 

Advertisement

शिक्षणाबद्दल त्यांची ओढ इतकी जबरदस्त होती की, वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू झाले. इतक्या कमी वयात हे मानाचे पद भूषवणारे ते सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भारतीय भाषांचा वापर वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

( नक्की वाचा : Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा )

राजकारणातील प्रवेश आणि मंत्रिपदाचा प्रवास

डॉ. मुखर्जी यांचा राजकीय प्रवास 1929 मध्ये बंगाल विधान परिषदेतून सुरू झाला. सुरुवातीला ते काँग्रेसशी जोडलेले होते, मात्र नंतर त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून सामील झाले. 

देशाच्या सुरुवातीच्या औद्योगिक धोरणाला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानसोबतच्या धोरणांबाबत नेहरूंशी असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी 1950 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

( नक्की वाचा : Tamil Nadu Election 2026 महिलांना सोनं ते तरुणांना पगार; Thalapathy Vijay यांनी कशी जिंकली तामिळनाडू निवडणूक? )

जनसंघाची स्थापना आणि काश्मीरसाठी संघर्ष

मंत्रिपद सोडल्यानंतर 1951 मध्ये डॉ. मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, जो आजच्या भारतीय जनता पक्षाचा मूळ आधार मानला जातो. त्यांनी 'एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे' अशी घोषणा देत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 ला कडाडून विरोध केला. 

Advertisement

काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असावे आणि तिथे पूर्णपणे भारतीय संविधान लागू व्हावे, ही त्यांची प्रमुख भूमिका होती. याच मुद्द्यावरून त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी मोठा संघर्ष उभा केला.

रहस्यमयी मृत्यू आणि अजरामर वारसा

काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी परवान्याची सक्ती करण्याच्या नियमाविरुद्ध आंदोलन करताना 1953 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. याच अटकेदरम्यान श्रीनगरमध्ये 23 जून 1953 रोजी कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण आजही वादाचा विषय असले तरी, त्यांनी देशाच्या ऐक्यासाठी दिलेले बलिदान विसरता येणारे नाही. आज बंगालमध्ये मिळालेला भाजपचा विजय हा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारधारेचा आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचा विजय असल्याचे मानले जात आहे

Advertisement