Ambedkarites and the Color Blue : आज देशभरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ राज्यघटनाच लिहिली नाही तर देशातील नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा उत्सव केवळ एका समाजासाठी नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी निळ्या रंगाचे झेंडे पाहायला मिळत आहे. बौद्ध धर्माच्या कोणत्याही कार्यक्रमात निळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. झेंड्यापासून, ते कार्यक्रमातील मंडपदेखील विशेष करुन निळ्या रंगाचे पाहायला मिळतात. आंबेडकरवादीही गर्वाने निळा रंग मिरवतात. मात्र बौद्ध धर्माचा आणि निळ्या रंगाचा काही संबंध आहे का? दलित आंदोलनापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सूटाचा रंगाही निळा का असतो?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचा संबंध काय? l connection between Dr. Babasaheb Ambedkar and blue color?
काही जाणकारांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निळा रंग प्रिय होता. निळा रंग वापरण्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे, निळा रंग आकाशाचं प्रतिक आहे. आकाश कोणताही भेदभाव न करता सर्वांना आपल्या छत्रछायेखाली घेतो. आकाशाखाली उभी असलेली व्यक्ती कोणत्याही धर्माची असो वा पंथाची असो आकाश कधीच भेदभाव करीत नाही, त्याच्यासाठी सर्व समान असतात. निळा रंग कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाचा स्वीकार करतो. यातूनच कालांतरने बसपासह अनेक आंबेडकरवादी पक्षांनी निळ्या रंगाचा स्वीकार केला. सध्या देशभरातली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला निळ्या रंगाचा कोट घातल्याचं पाहायला मिळतं. त्याशिवाय निळा रंग हा संघर्षाचं प्रतिक आहे. त्यामुळे निळा रंग आंबेडकरवादी चळवळीशी जोडला जातो. दरम्यान अशा अनेक थियरी आहेत.
काहींच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निळ्या रंगाचा कोट खूप प्रिय होता. तेव्हापासून निळा रंग दलितांशी जोडला जाऊ लागला.
निळा झेंडा अन्यायाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व...
निळा रंग हा केवळ एका समुदायाचा रंग उरलेला नसून, तो भारतीय संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा रक्षक मानला जातो. जेव्हा जेव्हा संविधानावर किंवा मानवी हक्कांवर गदा येते, तेव्हा हा 'निळा झेंडा' अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व करताना दिसतो. आपल्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्राचा रंग देखील 'नेव्ही ब्लू' (गर्द निळा) आहे. हे चक्र प्रगती, गती आणि धर्माचे (कर्तव्याचे) प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सतत पुढे जाण्याची आणि सर्वांना समान न्याय देण्याची आठवण करून देतो.
याशिवाय अनेक दक्षिण आशियाई परंपरेत बुद्ध आणि इतर बौद्ध व्यक्तींचं चित्रण अनेकदा निळ्या रंगात केलं जातं. याशिवाय निळा रंग हा कामगार वर्गाचा त्यातही शारिरीक श्रम करणाऱ्या कामगारांचा ब्लू कॉलर वर्कर्सचा रंग मानला जातो, असंही काहींचं मतं आहे.
(वरील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world