जगभरातील विद्येचं माहेरघर असलेलं नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजीनं का जाळलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बिहारच्या राजगीर परिसरातल्या नालंदा विद्यापीठ परिसराचं उद्घाटन केलंय. बख्तियार खिल्जीनं हे विद्यापीठ का जाळलं होतं?

Advertisement
Read Time: 3 mins
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बिहारच्या राजगीर परिसरातल्या नालंदा विद्यापीठ परिसराचं उद्घाटन केलं.
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बिहारच्या राजगीर परिसरातल्या नालंदा विद्यापीठ परिसराचं उद्घाटन केलं. साधारण हजार वर्षांपुर्वी जगभरातल्या विद्येचं नालंदा विद्यापीठ माहेरघर होतं.  असलेलं हे बिहारचं जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ अगदी अलिकडेपर्यंत निव्वळ भग्नावशेषांच्या स्वरूपात असलेल्या या विद्यापीठाचा तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने 2014 मध्ये जीर्णोद्धार करण्याचा निर्णय झाला आणि तब्बल दहा वर्षानंतर विद्यापिठाचं हे रुपडं साकारलं. आता तब्बल 455 एकर विस्तीर्ण परिसरात 221 इमारतींसह हा परिसर दिमाखात सज्ज झाला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाचव्या शतकात गुप्त वंशाचे सम्राट कुमार गुप्त याने या विद्यापीठाची स्थापना केली..त्यानंतरच्या सम्राट हर्षवर्धन आणि पाल वंशाच्या शासकांनी या विद्यापिठाचं पालकत्व स्विकारलं..या काळात या विद्यापिठाचा चांगलाच विस्तार झाला. जगभरातले जवळपास 10 हजार विद्वान या विद्यापीठात ज्ञानसाधना करत असत.   चीनी प्रवासी ह्युआनत्सांगने सुद्धा त्याच्या भारत भेटीदरम्यान नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती. आपल्या नोंदीमध्ये त्याने विद्यापीठाच्या कार्याचं कौतुक केलं होतं.

Advertisement

स्थापत्यकलेचा अद्भुत नमूना

नालंदा विद्यापीठ हे स्थापत्यकलेचा सुद्धा एक अद्भुत नमूना आहे. इथे 300 पेक्षा अधिक खोल्या आणि सात मोठी सभागृहं होती.साहित्य, खगोलशास्त्र, मनोविकास, कायदा, विज्ञान, दर्शनशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, आयुर्वेद, आणि योग या विषयांची जवळपास 90 लाख पुस्तकं तिथे होती. त्यासाठी नऊ मजली ग्रंथालयाची भव्य इमारत होती. जगभरातल्या विद्वानांचं केंद्र असलेलं हे नालंदा विद्यापीठ तुर्की आक्रमक बख्तियार खिल्जीच्या लहरीपणाचं बळी ठरलं. 1190 साली खिल्जीच्या सैन्यानं विद्यापीठाला आग लावून ते जाळून टाकलं. त्याची कहाणीसुद्धा अजब आहे.  

Advertisement

( नक्की वाचा : जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का? )

नालंदा विद्यापीठ का जाळलं?

बख्तियार खिलजी एकदा खूप आजारी पडला. त्याच्यावर हकीमांनी उपचार केले, पण काही केल्या गुण येईना. त्यावर कुणीतरी बख्तियार खिल्जीला नालंदा विद्यापीठातल्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्रजींकडून इलाज करून घेण्याचा सल्ला दिला. त्यावर आचार्यना बोलावलं गेलं, पण आपण तुमच्याजवळच्या कोणत्याही औषधाचं सेवन करणार नसल्याची अट खिल्जीने घातली. ही अट मान्य करत श्रीभद्रजींनी त्यांना एकेदिवशी कुराणाची प्रत देत त्याचं पठण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही दिवसांत खिलजी बरा झाला. कुराणाच्या पानांवर आचार्यजींनी औषधाचा लेप लावला होता. त्यामुळे कुराणाची पानं पलटत असताना खिलजी जेव्हा आपली बोटं जिभेला लावायचा तेव्हा पानांवर लावलेला लेप त्याच्या तोंडात जायचा आणि औषधाची मात्रा काम करायची आणि त्याची तब्येत सुधारत गेली. 

Advertisement

हे जेव्हा खिलजीला कळलं तेव्हा त्याला जाणवलं की खरंच युनानी उपचारांपेक्षा भारतीय वैद्यकशास्त्र खुपच प्रभावी आहे. त्यामुळे त्याच असुयेपोटी त्याने भारतीय ज्ञानाची जननी असलेलं नालंदा विद्यापीठ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तडीस नेला. असं म्हणतात ती नालंदामधली ग्रंथसंपदा इतकी अमाप होती की खिलजीनं विद्यापीठात लावलेली आग तब्बल तीन महिने धुमसत होती.यासोबतच खिल्जीच्या सैन्याने हजारो विद्वान आणि पंडितांनाही ठार केलं. या विध्वंसानंतर विद्यापीठ तर नष्टच झालं पण भारतीय ज्ञानप्रसाराची, बौद्ध धर्माची एक प्रखर ज्ञानशाखा खंडित झाली.