जाहिरात

देशभरात NEET वरून आंदोलन पेटलेलं असताना टॉपरने काय केलं? देशात दुसऱ्या आलेल्या पंशुलनं NDTV वर सांगितला मार्ग

NEET-UG परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राजकीय गदारोळ सुरू असतानाच, या प्रकरणातील एका टॉपरनं महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. '

देशभरात NEET वरून आंदोलन पेटलेलं असताना टॉपरने काय केलं? देशात दुसऱ्या आलेल्या पंशुलनं  NDTV वर सांगितला मार्ग
मुंबई:

NEET-UG परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राजकीय गदारोळ सुरू असतानाच, या प्रकरणातील एका टॉपरनं महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. 'नीट'च्या पुन्हा झालेल्या परीक्षेत देशात दुसऱ्या आलेल्या दिल्लीच्या पंशुल बंसल या विद्यार्थ्याने विरोध प्रदर्शनात सहभागी न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग निवडला. 'जेव्हा मी अभ्यास करून मार्क्स वाढवू शकत होतो, तर आंदोलनात कशाला जाऊ?' असा थेट सवाल त्याने NDTV शी बोलताना केला आहे.

आंदोलना ऐवजी अभ्यासाचा मार्ग 

पेपरफुटीच्या आरोपानंतर 12 मे रोजी परीक्षा रद्द झाली आणि देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. या काळात अनेक विद्यार्थी आणि संघटना रस्त्यावर उतरल्या. मात्र, दिल्लीच्या केआर मंगलम वर्ल्ड स्कूलचा विद्यार्थी असलेल्या पंशुल बंसल याने या गदारोळात स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवले. आंदोलनात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा घरच्या घरी राहून उजळणी करणे आणि आपली क्षमता वाढवणे अधिक योग्य असल्याचे त्याने मानले.

( नक्की वाचा : NEET Result: ना कोटा, ना कोणतं मोठं शहर... बारामतीतच अभ्यास करणारी श्रावणी देशात पाचवी , वाचा Success Story )
 

निराशेतून सावरत भरारी

पंशुलने सांगितले की, परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा सुरुवातीला त्याला मोठा धक्का बसला होता आणि तो निराश झाला होता. कारण पहिल्या परीक्षेतही त्याला सुमारे 706 मार्क्स मिळाले होते. मात्र, एका ते दोन तासांतच त्याने स्वतःला सावरले आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुनर्परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. आधीच्या अभ्यासाच्या पद्धतीत कोणताही मोठा बदल न करता त्याने सातत्य ठेवले.

पंशुलची हीच रणनीती यशस्वी ठरली आणि 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात त्याने 99.9999 पर्सेंटाईल मिळवत देशात ऑल इंडिया रँक 2 पटकावला. री-एग्जाममध्ये त्याने 715 गुण मिळवत पहिल्या परीक्षेपेक्षाही उत्तम कामगिरी करून दाखवली.

आंदोलनावर बोलण्यास नकार

देशभरात नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात सध्या सीबीआय तपास आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या सुरू असलेल्या विरोधावर आणि राजकीय वादावर प्रतिक्रिया विचारली असता, पंशुलने या विषयावर कोणतेही वक्तव्य करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. सध्याच्या वादग्रस्त आणि गोंधळाच्या वातावरणातही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून त्याने मिळवलेले हे यश लक्षवेधी ठरले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com