जाहिरात

NEET Paper Leak: "मी स्वतः दोनदा नीट परीक्षा दिलीय!" अभिनेत्रीची भावुक पोस्ट; CJP आंदोलनाला पाठिंबा

देशभरात सध्या NEET परीक्षेतील पेपर लीक आणि गैरव्यवहारावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बॉलिवूड अभिनेत्री आणि 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने जाहीर पाठिंबा दिला आहे.

NEET Paper Leak: "मी स्वतः दोनदा नीट परीक्षा दिलीय!" अभिनेत्रीची भावुक पोस्ट; CJP आंदोलनाला पाठिंबा

देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या NEET परीक्षेतील पेपर लीक आणि गोंधळावरून सध्या वातावरण तापले आहे. या आंदोलनात आता बॉलिवूड कलाकारांनीही उडी घेतली असून, 2017 ची मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहून विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आपला जुना अनुभव शेअर करताना मानुषीने सांगितले की, एका दशकापूर्वी तिलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

2015 मध्ये पेपर लीकमुळे मला दोनदा परीक्षा द्यावी लागली

मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "माझा नेहमीच विश्वास आहे की या असमान जगात शिक्षण हेच सर्वात मोठे समानतेचे साधन आहे. जे लोक सहज म्हणतात की 'पुन्हा परीक्षा देऊन टाका', त्यांना विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावनांची अजिबात कल्पना नाही. 2015 मध्ये पेपर लीक झाल्यामुळे मला स्वतःला दोनदा NEET परीक्षा द्यावी लागली होती. ही केवळ एक परीक्षा नसते, तर यात अनेक वर्षांची मेहनत, रात्रीची झोप घालवून केलेले कष्ट आणि संपूर्ण कुटुंबाच्या त्याग व आशा जोडलेल्या असतात."

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

मानुषीने पुढे म्हटलं की, "10 वर्षांपूर्वी आम्ही यंत्रणेतील चुका स्वीकारल्या आणि जो मार्ग सांगण्यात आला तो मानला. पण आता, एक दशकानंतर तरी आपण या यंत्रणेत सकारात्मक बदलाची अपेक्षा केली पाहिजे."

पालकांच्या त्यागाचा आणि कष्टाचा उल्लेख

डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आर्थिक व मानसिक ओढाताण सांगताना मानुषीने म्हटले की, "कोचिंग सेंटरमध्ये गेल्यावर डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाची खरी किंमत कळते. तिथे अनेक पालक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढून मुलांना अभ्यासासाठी पाठवतात. अनेक तरुण वर्षानुवर्षे ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिक्षण सर्व काही बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक पिढीची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पुढील पिढीसाठी अधिक चांगली आणि पारदर्शक यंत्रणा निर्माण करून ठेवली पाहिजे."

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

"मला भारतावर आणि आपल्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास"

आपल्या पोस्टचा शेवट करताना मानुषीने स्पष्ट केले की, "हे विधान देशाच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या विरोधात नाही. मला भारतावर आणि आपल्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. सर्वात मजबूत आणि योग्य तोडगा हा नेहमी संवाद, घटनात्मक प्रक्रिया आणि परस्पर आदरातूनच निघतो. आपण सर्वांनी संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे आणि हे कधीही विसरता कामा नये की आपले तरुणच देशाचे भविष्य आहेत." 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com