2024 वर्ष सरायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी यावर्षी घडल्या. भारताच्या राजकारणातील अनेक ऐतिहासिक गोष्टी यावर्षी नागरिकांनी पाहिल्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल ते विविध विधानसभा निवडणुकांचा निकाल.. अशा अनेक राजकीय गोष्टी यावर्षी चर्चेत राहिल्या.
निवडणुकांच्या निकालाने अनेकांना चकीत केले. मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांच्या अदाजांवर निवडणुकांच्या निकालाने प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. 2024 मधील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर एक नजर टाकुया.
(नक्की वाचा - Year Ender 2024 : देशाच्या 'या' लेकींनी रचला इतिहास, 2024 गाजवलं!)
- केंद्रात पुन्हा मोदी सरकार : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने '400 चे पार'चा नारा भाजपने दिला होता. भाजपसोबतच राजकीय विश्लेषकांनाही हा आकडा पार करेल, असा विश्वास होता. पण, निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकित केले. एकट्या भाजपला बहुमताचा आकडाही स्पर्श करता आला नाही आणि केवळ 240 जागांवर भाजपला रोखण्यात विरोधकांना यश मिळालं. मात्र, टीडीपी, जेडीयू आणि इतर मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना केवळ 33 जागा जिंकता आल्या.
- ओडिसामध्ये नवीन पटनायक यांच्या 24 वर्षांच्या सत्तेला सुरुंग : लोकसभा निवडणुकीशिवाय यावर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या. या राज्यांच्या निवडणूक निकालांनीही धक्का दिला. ओडिशामध्ये 24 वर्षे सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात भाजप मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
- हरियाणात विश्लेषकांचे अंदाज फेल : हरियाणा विधानसभा निवडणुकीतही राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरले. राजकीय विश्लेषकांनी येथे भाजप विरोधात वातावरण असल्याचं म्हटलं होतं. सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी जनता सत्तेबाहेर बसवणार असं बोललं जात होते. भुपेंद्र सिंह हुड्डा याच्या नेतृत्वात काँग्रेस हरियाणामध्ये सत्ता स्थापन करेल, असं सर्वत्र बोललं जात होतं. मात्र पुन्हा भाजपने हरियाणामध्ये बाजी मारली आणि सर्वांनाच चकीत केले.
- महाराष्ट्रात महायुतीची ऐतिहासिक कामगिरी : महाराष्ट्रातही महायुती सरकारविरोधात वातावरण असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेची सहानुभूती मिळेल आणि सत्तेत येईल, अशी आशा होती. लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास देखील वाढला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत 132 जागांवर विजय मिळवला.
- जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये भाजपला धक्का : जम्मू-काश्मीरमध्ये देखील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक पार पडली. कलम 370 हटवल्यानंतर भाजपला येथील निवडणुकीत यश मिळेल अशी आशा होता. मात्र जम्मू-काश्मीरमधील जनतेने ओमर अबुल्लाह याच्या नॅशनल काँन्फरन्स पक्षावर विश्वास दाखवला. झारखंडमध्येही भाजप सरकार स्थापनेचा दावा करत होता. मात्र तिथे भाजपची निराशा झाली आणि हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने तेथे पुन्हा सरकार स्थापन केले.